वृत्तसंस्था/ हरारे
शुक्रवारी पहिल्या वनडे सामन्यात बांगलादेशने 50 षटकात 9 बाद 276 धावा जमवित झिम्बाब्वेला 277 धावांचे आव्हान दिले होते. मात्र शकीब अल हसनच्या भेदक माऱयापुढे झिम्बाब्वेचा डाव 28.5 षटकांत 121 धावांत संपुष्टात आणत बांगलादेशन 155 धावांनी दणदणीत विजय मिळविला. बांगलादेशचा शतकवीर लिटॉन दासला सामनावीराचा बहुमान मिळाला.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या डावात सलामीचा फलंदाज लिटॉन दासने 114 चेंडूत 8 चौकारासह 102 झळकविल्या. मेहमुदुल्लाने 52 चेंडूत 1 षटकारासह 33, अतिफ हुसेनने 35 चेंडूत 2 षटकार आणि एक चौकारासह 45, मेहदी हसन मिराजने 25 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 26 धावा जमविल्या. कर्णधार तमीम इक्बालला खाते उघडता आले नाही. झिंबाब्वेच्या अचूक गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. लिटॉन दास आणि मेहमुदुल्ला यांनी पाचव्या गडय़ासाठी 93 धावांची भागीदारी केली. बांगलादेशच्या डावात 4 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. झिंबाब्वेतर्फे जाँग्वेने 51 धावात 3 तर मुझारबनी आणि रिचर्ड एन्गराव्हा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना झिम्बाब्वेच्या डावात रेगिस छकब्वाने सर्वाधिक 54, कर्णधार बेन्डॉन टेलरने 24, डायन मायर्सने 18 धावा जमविल्या. अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. शकीबने 30 धावांत 5 बळी मिळविले. दुसरा याच मैदानावर 18 जुलै रोजी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश 50 षटकात 9 बाद 276 (लिटॉन दास 102, अतिफ हुसेन 45, मेहमुदुल्ला 33, मेहेदी हसन मिराज 26, शकीब अल हसन 19, मोहम्मद मिथून 19, जाँग्वे 3-51, मुझारबनी 2-47, एन्गराव्हा 2-61). झिम्बाब्वे 28.5 षटकांत सर्व बाद 121 (छकब्वा 54, टेलर 24, मायर्स 18, शकीब हसन 5-30, तस्किन अहमद 1-22, मोहम्मद सैफुद्दिन 1-23, शोरिफुल इस्लाम 1-28).