वृत्तसंस्था/ ढाका
दक्षिण आफ्रिकेत 11 फेब्रुवारीपासून खेळवल्या जाणाऱया आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी बांगलादेश संघाची घोषणा करण्यात आली असून यू-19 संघातील अनेक क्रिकेटपटूंचा त्यात समावेश करण्यात आला आहे.
क्रिकेट बांगलादेशने या स्पर्धेसाठी 15 सदस्यांचा महिला संघ निवडला असून या संघाचे नेतृत्व निगार सुलतानाकडे सोपवण्यात आले आहे. सध्या द. आफ्रिकेत सुरू असलेल्या आयसीसीच्या महिलांच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या बांगलादेश संघातील अनेक खेळाडूंचा वरील संघात समावेश आहे. बांगलादेश महिला संघाचे या स्पर्धेपूर्वी दोन सरावाचे सामने आयोजित केले आहेत. 6 फेब्रुवारीला त्यांचा पहिला सरावाचा सामना पाक बरोबर तर दुसरा सरावाचा सामना 8 फेब्रुवारीला भारताबरोबर होणार आहे. महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशचा सलामीचा सामना12 फेब्रुवारीला लंकाबरोबर होणार आहे.
बांगलादेश महिला संघ- निगार सुलताना जॉटी (कर्णधार), मारुफा अख्तर, दिलारा अख्तर, फईमा खातून, सलमा खातून, जहानआरा आलम, शमिमा सुलताना, रुमाना अहमद, लता मोंडल, शोरमा अख्तर, नाहीदा अख्तर, मुर्शिदा खातून, रितू मोनी, दिशा विश्वास आणि शोभना मोस्तरी.