वृत्तसंस्था/ रावळपिंडी
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत यजमान पाकने बांगलादेशला पहिल्या डावात 233 धावावर रोखले. या सामन्यात बांगलादेशतर्फे मोहम्मद मिथुनने अर्धशतक झळकविले. पाकतर्फे शाहिन आफ्रिदीने 4 गडी बाद केले.
या कसोटीत पाकने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. त्यांचे पहिले दोन फलंदाज केवळ 3 धावांमध्ये तंबुत परतले. त्यानंतर नजिमुल हुसेन आणि कर्णधार मोमिनुल हक यानी तिसऱया गडय़ासाठी 59 धावांची भागिदारी केली. मोमिनुल हकने 5 चौकारासह 30 तर नजमुल हुसेनने 6 चौकारासह 44 धावा जमविल्या. पाकच्या अचूक गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले.
मेहमुदुल्लाहने 4 चौकारासह 25 धावा जमविल्या. मोहम्मद मिथुनने चिवट फलंदाजी करत 140 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह 63 धावा जमविताना दाससमवेत सहाव्या गडय़ासाठी 54 धावांची भर घातली. दासने 7 चौकारासह 33 धावा जमविल्या. तैजुल इस्लामने 4 चौकारासह 24 धावा केल्या. बांगलादेशचे शेवटचे तीन फलंदाज लवकर बाद झाले. 82.5 षटकात बांगलादेशचा पहिला डाव 233 धावात आटोपला. पाकतर्फे शाहिन आफ्रिदीने 53 धावात 4, मोहम्मद अब्बासने 19 धावात 2, हॅरीस सोहेलने 11 धावात 2 आणि नसीम शहाने 61 धावात 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक- बांगलादेश प डाव- 82.5 षटकात सर्वबाद 233 (मोहम्मद मिथुन 63, नजमुल हुसेन 44, मोमिनुल हक 30, दास 33, मेहमुदुल्ला 25, टी इस्लाम 24, शाहिन आफ्रिदी 4-53, अब्बास 2-19, सोहेल 2-11, नसिम शहा 1-61).