वृत्तसंस्था/ माऊंट मॉंगनुई
कर्णधार मोमिनूल हक आणि लिटॉन दास यांच्या दीडशतकी भागिदारीच्या जोरावर येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत सोमवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर बांगलादेशने पहिल्या डावात 6 बाद 401 धावा जमवित यजमान न्यूझीलंडवर 73 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली आहे. मोमिनूल हकने 88 तर लिटॉन दासने 86 धावा झळकविल्या.
या पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा पहिला डाव 328 धावांत आटोपला. बांगलादेशने 2 बाद 175 या धावसंख्येवरून सोमवारी खेळाला पुढे सुरूवात केली. बांगलादेशचा मेहमुदुल हसन जॉयने 228 चेंडूत 7 चौकारांसह 78 धावा झळकविल्या. वॅग्नरने त्याला झेलबाद केले. त्यानंतर बोल्टने मुश्फिकूर रहीमचा त्रिफळा उडविला. त्याने 12 धावा केल्या. कर्णधार मोमिनूल हक आणि लिटॉन दास यांनी पाचव्या गडय़ासाठी 158 धावांची भागिदारी केल्याने बांगलादेशला या सामन्यात न्यूझीलंडवर आघाडी मिळविता आली. बोल्टच्या गोलंदाजीवर कर्णधार मोमिनूल हक पायचीत झाला. त्याने 244 चेंडूत 12 चौकारांसह 88 धावा झळकविल्या. लिटॉन दासही नंतर लगेचच बाद झाला. बोल्टने त्याला झेलबाद केले. दासने 177 चेंडूत 10 चौकारांसह 86 धावा जमविल्या. दिवसअखेर बांगलादेशने 156 षटकांत 6 बाद 401 धावा जमवित न्यूझीलंडवर 73 धावांची आघाडी मिळविली आहे. न्यूझीलंडतर्फे वॅग्नरने 98 धावांत 3 तर बोल्टने 61 धावांत 3 गडी बाद केले.
आशिया खंडाच्या बाहेर कसोटी सामन्यात खेळताना बांगलादेशने पहिल्या डावात फलंदाजी करत पहिल्यांदाच न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात आघाडी मिळविली आहे. चार वर्षांपूर्वी बांगलादेशने न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या वेलिंग्टनमधील कसोटीत पहिल्या डावात फलंदाजी करत आघाडी मिळविली होती पण दुसऱया डावात बांगलादेशची फलंदाजी कोलमडल्याने त्यांना हा सामना 7 गडय़ांनी गमवावा लागला होता.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड प. डाव- 108.1 षटकांत सर्वबाद 328, बांगलादेश प.डाव- 156 षटकांत 6 बाद 401 (एस. इस्लाम 22, मेहमुदुल हसन जॉय 78, नजमुल हुसेन 64, मोमिनूल हक 88, रहीम 12, लिटॉन दास 86, यासीर अली खेळत आहे 11, मेहदी हसन मिराज खेळत आहे 20, बोल्ट 3-61, वॅग्नर 3-98).