वृत्तसंस्था /हरारे
यजमान झिम्बाब्वेविरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात 468 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर गुरूवारी खेळाच्या दुसऱया दिवशी झिम्बाब्वेने उपाहारापर्यंत पहिल्या डावात बिनबाद 11 धावा जमविल्या होत्या. बांगलादेशच्या मेहमुदुल्ला रियादने नाबाद दीडशतक (150) झळकविले तर दासचे शतक 5 धावांनी हुकले. तस्किन अहमदने 75 धावांची खेळी केली. झिम्बाब्वेतर्फे मुझारबेनीने 4 तर तिरिपानो आणि नेयुची यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
बांगलादेशच्या पहिल्या डावात आघाडीचे पहिले तीन फलंदाज लवकर बाद झाले. हेसनला खाते उघडता आले नाही. एस. इस्लामने 4 चौकारांसह 23 धावा जमविल्या. नईमूल हुसेनने 2 धावा जमविल्या. कर्णधार मोमीनूल हकने 92 चेंडूत 13 चौकारांसह 70 धावा जमविल्या. मुस्ताफिझुर रहीमने 11 तर शकीब अल हसनने 3 धावा जमविल्या. बांगलादेशचा निम्मा संघ 109 धावांत तंबूत परतला होता.
लिटॉन दास आणि मेहमुदुल्ला यांनी सातव्या गडय़ासाठी 138 धावांची भागीदारी करत डाव सावरला. दासने 147 चेंडूत 13 चौकारांसह 95 धावा जमविल्या. तो बाद झाल्यानंतर मेहमुदुल्लाला तस्किन अहमदने चांगली साथ दिली. या जोडीने नवव्या गडय़ासाठी 191 धावांची भागिदारी केल्याने बांगलादेशला 468 धावापर्यंत मजल मारता आली. मेहमुदुल्लाने 1 षटकार आणि 17 चौकारांसह नाबाद 150 तर तस्किन अहमदने 11 चौकारांसह 75 धावा जमविल्या. 126 षटकांत बांगलादेशचा पहिला डाव 468 धावांत आटोपला. बांगलादेशने 8 बाद 404 या धावसंख्येवरून खेळाला पुढे प्रारंभ केला होता.
संक्षिप्त धावफलक : (उपाहारापर्यंत)
बांगलादेश प. डाव 126 षटकांत सर्वबाद 468 (मेहमुदुल्ला नाबाद 150, दास 95, तस्किन अहमद 75, मोमिनूल हक 70, एस. इस्लाम 23, मुझारबेनी 4-94, तिरिपानो 2-58, नेयुची 2-92, शुंभा 1-64, निगेरेव्हा 1-83), झिंबाब्वे प. डाव 7.3 षटकांत बिनबाद 11.