वृत्तसंस्था/ जॉर्जटाऊन (गयाना)
आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या मोहिमेला इंग्लंडने विजयाने प्रारंभ केला. रविवारी येथे झालेल्या अ गटातील सामन्यात इंग्लंडने विद्यमान विजेत्या बांगलादेशचा 7 गडय़ांनी पराभव केला.
या सामन्यात इंग्लंडच्या भेदक माऱयासमोर बांगलादेशची फलंदाजी साफ कोलमडली. 25 षटकांअखेर बांगलादेशची स्थिती 9 बाद 51 अशी केविलवाणी झाली होती. 11 व्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या रिपॉन मोंडलने नईमूर रेहमान समवेत शेवटच्या गडय़ासाठी 46 धावांची भागिदारी केली. मोंडलने नाबाद 33 धावा जमविल्या. बांगलादेशचा डाव 36 षटकात 97 धावांत आटोपला. 2020 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयसीसीच्या या स्पर्धेत बांगलादेशने विजेतेपद पटकाविले होते.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. इंग्लंडचा सलामीचा फलंदाज थॉमसने 3 चौकारांसह 15 धावा जमविल्या. चुकीचा फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. 9 षटकांअखेर इंग्लंडने 1 बाद 20 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार प्रेस्ट 4 धावांवर झेलबाद झाला. रिव्हे आणि बेथेल या जोडीने इंग्लंडचा डाव सावरला. बेथेलने 63 चेंडूत 44 धावा जमविल्या. चोरटी धाव घेण्याच्या नादात तो धावचीत झाला. रिव्हेने 39 चेंडूत नाबाद 26 धावा जमवित आपल्या संघाला 7 गडय़ांनी विजय मिळवून दिला. रिव्हेने विजयी धाव घेतली. या विजयामुळे इंग्लंडने अ गटात दोन गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. इंग्लंडचा आता या स्पर्धेतील पुढील सामना कॅनडा संघाबरोबर मंगळवारी होणार आहे. तसेच बांगलादेशचा पुढील सामना गुरुवारी खेळविला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश- 36 षटकात सर्व बाद 97. (रिपॉन मोंडल नाबाद 33, नईमूर रेहमान 11), इंग्लंड- 3 बाद 98. (रिव्हे नाबाद 26, बेथेल 44).