जगभरात आतापर्यंत 62,87,890 जणांना कोरोनाची लागण : महामारीच्या संसर्गाचे एकूण 3,74,327 बळी
जगभरात आतापर्यंत 62 लाख 87 हजार 890 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 लाख 74 हजार 327 जण दगावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे 28 लाख 58 हजार 509 बाधितांनी या संसर्गावर मात केली आहे. संसर्गावर नियंत्रण मिळविल्यावर टाळेबंदी शिथिल करण्याचा घेतलेला निर्णय दक्षिण कोरियाच्या अंगलट आल्याचे दिसून येत आहे. नाइटक्लबनंतर एक नवे क्लस्टर लॉजिस्टिक हब बुचियोनमध्ये आढळून आले आहे. रविवारी देशात 35 नवे रुग्ण सापडले आहेत. सरकार शाळा पुन्हा सुरू करू पाहत असले तरीही यासंबंधी निर्णय घेताना गोंधळले आहे. शाळा दोनवेळा सुरू करून संसर्गाच्या भीतीपोटी पुन्हा बंद कराव्या लागल्या आहेत. तर दुसरीकडे बांगलादेशने टाळेबंदी हटविली आहे.
धोका पण निर्बंध शिथिल
वाढते रुग्ण आणि डॉक्टरांच्या इशाऱयानंतरही बांगलादेश सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. तेथील शहरांमध्ये लोकसंख्येची घनता अधिक असल्याने धोका तुलनेत जास्त आहे. टाळेबंदी हटवत असून जनजीवन पूर्वपदावर येणार आहे. लोक पूर्वीप्रमाणे कामावर जाऊ शकतील. परंतु यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगसह मुखपट्टा परिधान करणे अनिवार्य राहणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. बांगलादेशात दिवसभरात 2,545 नवे रुग्ण सापडले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे.
द. कोरियात 35 नवे रुग्ण
दक्षिण कोरियात 35 नवे बाधित सापडले असून तेथील दोन क्लस्टर त्रासदायक ठरले आहेत. सोल येथील नाइटक्लबशी संपर्क आलेले 270 रुग्ण सापडले आहेत. तर बुचियोन या लॉजिस्टिक हबशी संबंधित 181 बाधित आढळले आहेत. बुचियोनमध्ये 4 हजार जणांची चाचणी करण्यात आली आहे. तर नाइटक्लबशी संबंधित 11 हजार चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात एकूण 12 हजार बाधित सापडले असून 271 जणांचा मृत्यू झाला आहे.
जपानमध्ये 33 नवे बाधित
मागील 24 तासांत जपानमध्ये 33 नवे कोरोनाबाधित सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात एकूण 17 हजार 597 रुग्ण आढळले असून 905 जण दगावले आहेत. राजधानी टोकियोमध्ये दिवसभरात 5 नवे रुग्ण सापडले आहेत. टोकियोमध्ये 10 पेक्षा कमी रुग्ण आढळण्याची आठवडय़ातील ही पहिलीच वेळ आहे. तेथे रिकव्हरी प्लॅन फेज2 सध्या सुरू असून यांतर्गत शाळा आणि उद्योग खुले केले जात आहेत.
अमेरिकेची मदत
अमेरिका आणि ब्राझीलने संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. अमेरिका अत्यंत लवकरच ब्राझीलला 1 हजार व्हेंटिलेटर्स आणि हायड्रॉक्सी क्लोरोक्विनच्या 20 लाख गोळय़ा पुरविणार असल्याचे यात नमूद आहे. ब्राझीलमध्ये सर्वसामान्यांसह डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या धोक्याला तोंड देत असल्याने एचसीक्यू गोळय़ा पाठविल्या जात आहेत. अमेरिकेत या गोळय़ांचा वापर सुरू असल्याचे म्हटले गेले आहे. अमेरिकेने ब्राझीलसाठी पुढाकार घेतला आहे.
कतार : संसर्गाला वेग
कतारमध्ये मागील 24 तासांमध्ये 1,648 नवे बाधित सापडले आहेत. तर 4 हजार 451 जणांनी कोरोना संसर्गावर मात केला आहे. देशात आतापर्यंत 56 हजार 910 बाधित सापडले आहेत. तेथे आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू ओढवला आहे. देशात आतापर्यंत 22 लाखांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधानांनाच लागण
आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनियन यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनाच लागण झाली आहे. पंतप्रधानांमध्ये कुठलीच लक्षणे दिसून आलेली नाहीत. संसर्गामुळे घरातूनच काम करणार असल्याचे निकोल यांनी सांगितले आहे. त्यांना एका वेटरमुळे लागण झाल्याचे मानले जात आहे.
चीनमध्ये 32 नवे बाधित
चीनमध्ये दिवसभरात 32 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यातील 16 जण विदेशातून परतले होते. याचदरम्यान महामारीच्या दुसऱया लाटेची शक्यता असलेल्या देशातील अनेक भागांवर सरकारने बारकाईने नजर ठेवली आहे. छोटी शहरे आणि भागांमधील वैद्यकीय कर्मचाऱयांना देशातील वैद्यकीय तज्ञ प्रशिक्षण देत आहेत.
उ. कोरिया : शाळा सुरू
उत्तर कोरियातील सर्व शाळा चालू महिन्यात सुरू केल्या जाणार आहेत. उत्तर कोरियाने आतापर्यंत एकाही रुग्णाची माहिती दिलेली नाही. परंतु तेथे संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत कठोर उपाय योजण्यात आले आहेत. शाळा देखील दोन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आल्या होत्या. शाळा कुठल्या तारखेला सुरु होतील हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.