इस्कॉन मंदिरात जमावाकडून तोडफोड-लूटमार, अनेक जण जखमी
ढाका / वृत्तसंस्था
बांगलादेशमधील इस्कॉन मंदिरावर पुन्हा एकदा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बांगलादेशची राजधानी ढाका येथे गुरुवारी संध्याकाळी जमावाने हल्ला केल्याचा प्रकार निदर्शनास आला. हाजी सैफुल्लाच्या नेतृत्वाखाली 200 हून अधिक लोकांच्या जमावाने हा हल्ला केला होता. या हल्ल्यात मंदिराची तोडफोड करण्यात आली असून जमावाने मौल्यवान वस्तू लुटल्याचे दिसून आले आहे. यावेळी झालेल्या संघर्षात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
ढाक्यातील इस्कॉन राधाकांता मंदिरात गुरुवारी सायंकाळी 7 वाजता जवळपास 200 जणांचा जमाव घुसला होता. हाजी सैफुल्लाच्या नेतृत्वाखाली हा हल्ला केला होता. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत संघर्ष मिटविण्याचा प्रयत्न केला. तथापि, रात्री उशिरापर्यंत शहरात तणावाचे वातावरण होते. तणावपूर्ण वातावरणामुळे मंदिराला अतिरिक्त सुरक्षा पुरविण्यात आली होती. तसेच शहरात अन्यत्रही बंदोबस्त वाढविण्यात आला होता. शुक्रवारी दिवसभरही या घटनेचे संतप्त पडसाद उमटत होते.
9 वर्षांत 3,600 हून अधिक हल्ले
बांगलादेशात यापूर्वीही बऱयाचवेळा हिंदू मंदिरावर हल्ले झालेले आहेत. गेल्या वषी नवरात्रीला हिंदूंविरोधात अफवा पसरवून दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले झाले होते. बांगलादेशातील अल्पसंख्याकांना गेल्या 9 वर्षांत 3,679 हल्ल्यांचा सामना करावा लागला. यादरम्यान धार्मिक स्थळांची तोडफोड आणि सशस्त्र हल्ल्याची 1,678 प्रकरणे समोर आली आहेत. याशिवाय हिंदू समाजाला लक्ष्य करून घरांची तोडफोड, जाळपोळ यासह वारंवार हल्ले होत असल्याचे अल्पसंख्याकांच्या हक्कांवर काम करणाऱया संस्थेने स्पष्ट केले आहे.