कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय : 48 रुग्ण सापडले
बांगलादेश सरकारने कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी रस्त्यावर सैन्य तैनात केले आहे. छावण्यांमध्ये परतण्याचा आदेश मिळेपर्यंत सैनिक ‘अँटी कोविड-19 स्ट्रीट कँपेन’ सुरूच ठेवणार असल्याचे सैन्याने म्हटले आहे. कोरोना महामारीशी लढण्यासाठी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली ‘शक्य ते सर्व प्रयत्न’ करू. सैन्याच्या उपस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक तसेच प्रशासनाला ‘ऊर्जा’ प्राप्त झाल्याचे उद्गार सैन्यप्रमुख अजीज अहमद यांनी काढले आहेत.
पंतप्रधान हसिना यांनी कोविड-19 विरोधी मोहिमेला युद्ध संबोधिले असून त्यांच्या सरकारने देशात महामारीला तोंड देण्यासाठी प्रशासनाच्या मदतीकरता सशस्त्र दलांना पाचारण केले आहे.
सोशल डिस्टेंसिंग लागू करण्यासाठी देशभरात एकूण 300 सैनिक आणि 400 नौसैनिकांना तैनात करण्यात आले आहे. तर वायुदलाला बांगलादेशच्या कुठल्याही भागात रुग्ण तसेच वैद्यकीय मदत पोहोचविण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. सैनिकांच्या नव्या तुकडय़ा वेळोवेळी कोविड-19 विरोधी मोहिमेत तैनात सैनिकांची जागा घेणार आहेत.
बांगलादेशात राजधानी ढाका तसेच अन्य शहरांमध्ये सैनिक गस्त घालत असल्याचे दिसून येते. कोरोनामुळे बांगलादेशात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून 48 जणांना लागण झाली आहे. शाळा बंद करणे आणि विदेशासाठी उड्डाणसेवा रोखल्यावर 7 दिवसांसाठी देशव्यापी टाळेबंदीच्या दिशेने पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारने कार्यालये, व्यवसाय आणि सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्याचा आदेश दिला आहे.