महिलांची विश्वचषक पात्रता क्रिकेट स्पर्धा
वृत्तसंस्था / हरारे
महिलांच्या आयसीसी विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत प्रवेश मिळविण्यासाठी येथे सुरु असलेल्या 9 संघांच्या पात्रता स्पर्धेतील पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 3 गडय़ांनी पराभव केला तर दुसऱया एका सामन्यात थायलंडने यजमान झिम्बाब्वेचा 8 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली.
या स्पर्धेतील रविवारी पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा तीन गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पॉवरप्लेमध्ये पाकला केवळ 20 धावा जमविता आल्या. 50 षटकात पाकचा डाव 201 धावात आटोपला. त्यानंतर बांगलादेशने 7 गडय़ांच्या मोबदल्यात 202 धावा जमवित हा सामना 2 चेंडू बाकी असताना 3 गडय़ांनी जिंकला.
पाकच्या खेळाडूनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी तसेच चपळ क्षेत्ररक्षण केल्याने बांगलादेशला धावा घेण्यासाठी झगडावे लागले. शेवटच्या 10 षटकात बांगलादेशला विजयासाठी 89 धावांची जरुरी होती. बांगलादेश संघातील रुमाना अहमद आणि रिटू मोनी यांनी शेवटच्या कांही षटकामध्ये चौकार ठोकण्यात यश मिळविले. अहमदने डावातील 44 व्या षटकात 2 चौकार तर रिटूने पाकच्या सेनाच्या एका षटकात तीन सलग चौकार ठोकले. अहमदने डावातील शेवटच्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. सलमा खेतूनने 11 चेंडूत नाबाद 16 धावा जमवित बांगलादेश संघाला 2 चेंडू बाकी ठेवून थरारक विजय मिळवून दिला.
थायलंडचा झिम्बाब्वेवर विजय
या स्पर्धेतील रविवारी झालेल्या दुसऱया सामन्यात थायलंडने यजमान झिम्बाब्वेचा 8 धावांनी पराभव केला. या सामन्यात थायलंडने प्रथम फलंदाजी करताना 247 धावा जमविल्या. त्यानंतर झिम्बाब्वेचा डाव 239 डावात आटोपला.
महिलांची आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा न्यूझीलंडमध्ये 4 मार्च ते 3 एप्रिल 2022 साली भरविली जाणार आहे. या स्पर्धेत या पूर्वी 5 संघांनी आपली पात्रता सिद्ध केली असून त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, दक्षिण आफ्रिका व यजमान न्यूझीलंड यांचा समावेश आहे. झिम्बाब्वेत सुरु असलेल्या पात्र फेरी स्पर्धेतील अंतिम तीन संघ निवडले जातील. लंकन महिला संघाचा या पात्र फेरीच्या स्पर्धेतील पहिला सामना मंगळवारी हॉलंडविरुद्ध होणार आहे.
लंकेचे तीन खेळाडू कोरोनाबाधित
या स्पर्धेत सहभागी झालेल्या लंकन महिला संघातील तीन क्रिकेटपटूंना कोरोनाची बाधा झाली असून त्यांना आयसोलेट केले गेले आहे.
कोरोनाची बाधा झालेल्या लंकेच्या या तीन खेळाडूंपैकी दोन खेळाडूंना कोरोनाची किरकोळ लक्षणे दिसत असल्याचे सांगण्यात आले. या स्पर्धेपूर्वी स्पर्धा आयोजिकांनी कोरोनासंदर्भातील सर्व खबरदारी घेतली असून कोरोना नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली. मात्र, यानंतरही 3 खेळाडूंना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. खबरदारीचा उपाय म्हणून या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर देशांच्या संघांपासून लंकन संघाला दूर ठेवण्यात आले आहे.