ऑनलाईन टीम / ढाका :
बांग्लादेशात पुन्हा एकदा कट्टरपंथीयांनी हिंदू मंदिरावर हल्ला चढवला आहे. बांग्लादेशची राजधानी ढाका येथील इस्कॉन राधाकांता मंदिरावर गुरुवारी सायंकाळी 200 हून अधिक जणांच्या जमावाने हल्ला केला. या जमावाने मंदिराची तोडफोड करत मंदिरात ठेवलेल्या मौल्यवान वस्तू लुटल्या. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीत मंदिरातील तीन सेवक जखमी झाले आहेत. सुमंत्रचंद्र श्रवण, निहार हलदर आणि राजीव भद्रा अशी जखमी सेवकांची नावे आहेत.
ढाकामधील वारीच्या 222 लाल मोहन साहा स्ट्रीट येथील इस्कॉन मंदिरात गुरुवारी सायंकाळी 7 वाजता हिंदू भाविक एका सोहळय़ाची तयारी करत असताना हा हल्ला झाला. हाजी सैफी उल्लाह यांच्या नेतृत्वाखाली 200 हून अधिक जणांच्या जमावाने मंदिराची तोडफोड करत लुटमार केली. या हल्ल्यात मंदिरातील तीन सेवकांसह अनेकजण जखमी झाले.
या हल्ल्याचा भारताने निषेध केला आहे. कोलकात्यातील इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष राधारामन दास म्हणाले की, हा हल्ला अत्यंत दुदैवी विषय आहे. आम्ही बांग्लादेश सरकारला विनंती करतो की, त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि देशातील हिंदू अल्पसंख्याकांना सुरक्षा पुरवावी.