ऑनलाईन टीम / बांग्लादेश :
जगात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. बांग्लादेशात मागील 24 तासात 6,469 नवे रुग्ण आढळून आले. ही संख्या या वर्षातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. त्यामुळे देशातील एकूण संख्या 6 लाख 17 हजार 174 इतकी झाली आहे .
- कोरोनामुळे हजारो लोकांचा मृत्यू
इथे कोरोनामुळे हजारो लोकांनी आपला जीव गमावला आहे. मागील काही दिवसांपासून येथे कोरोनाचा संसर्ग प्रमाणाबाहेर वाढला आहे. हे वाढते प्रमाण थांबायचे नावच घेत नाही आहे. त्यामुळे बांग्लादेशातील शेख हसीना सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता 5 एप्रिल पासून पुढील सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.
तसेच सरकारकडून जनतेला सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हसिना शेख यांनी सांगितले की, या महामारीला रोखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी सर्व नागरिकांच्या मदतीची गरज आहे. तसेच आतापासून बांग्लादेशातील कार्यालयात केवळ 50% च कर्मचारी उपस्थित राहतील तसेच सर्व प्रकारचे धार्मिक, राजकीय, सामाजिक आणि अन्य सार्वजनिक कार्यक्रमांवर आता पूर्णपणे बंदी असणार आहे.