म्हैसूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोडावलेला पर्यटन व्यवसाय आता काहीअंशी पूर्व पदावर येत असून राज्यात पर्यटकांची संख्याही वाढत आहे. दरम्यान कर्नाटकमधील वाघ आणि हत्तींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात (बीटीआर) गेल्या दोन आठवड्यांपासून पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज सुमारे ६०० हुन अधिक लोक सफारीचा आनंद घेत आहेत. दररोज ५० टक्के पेक्षा जास्त ऑनलाईन बुकिंग केले जात आहे. मात्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत पर्यटकांची संख्या कमी होती. ख्रिसमस आणि नवीन वर्षामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. बेंगळूर आणि कर्नाटकातील इतर जिल्ह्यांमधून बहुतेक पर्यटक दाखल होत आहेत. कोविड साथीच्या प्रसारामुळे, इतर राज्यांमधील भेट देणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे.
या व्याघ्र प्रकल्पात वाघ मोठ्या संख्येने दृश्यमान असूनही ते पाहणे आपल्यासाठी नशिबाची बाब आहे. सफारी चालकांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत हत्ती आणि बिबट्या नियमितपणे पाहिले गेले आहेत. ऊटी आणि वायनाडला भेट देणारे पर्यटक निश्चितच म्हैसूर आणि बांदीपूरला भेट देतात.
वन्यजीव प्रेमींनी क्षमतेनुसार बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांची संख्या नियंत्रित करण्याचे सूचित केले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार क्षमतेपेक्षा कमी लोकांना आत सोडले जात आहे. सध्या बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील ८७४ चौरस किलोमीटर क्षेत्रातील १० टक्के क्षेत्र पर्यटकांसाठी खुले आहे.