मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून इतिहासाची पाने पुसून टाकण्याचा प्रयत्न : सुदिन ढवळीकर यांची टीका
वार्ताहर / मडकई
फर्मागुडीच्या या किल्ल्यावर सरकार व बांदोडा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमानेच ही छत्रपती शिवाजी महारांजाची जयंती साजरी होत होती. अध्यक्ष पदाचा मानही बांदोडा पंचायतीला असायचा. हा 47 वर्षांचा इतिहास आहे. या कालखंडात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. पण त्यांनी कधीच बांदोडा पंचायतीचा अवमान केला नाही. आतापर्यंच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी बांदोडा पंचायतीचा मान राखलेला आहे. मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून एका मंत्र्याचा मान राखण्यासाठी इतिहासाची पाने पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला. बांदोडा पंचायत, बांदोडय़ातील नागरीक व शिवप्रेमी हा त्यांचा कुटील डाव कधीच सफल होऊ नेणार नसल्याचा इशारा शिवजयंतीवेळी माजी उपमुख्यमंत्री मगो नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिला.
फर्मागुडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आमदार सुदिन ढवळीकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बांदोडा सरपंच राजेश नाईक, कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, माजी मंत्री तथा मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, केंद्रीय समितीचे पदाधिकारी प्रताप फडते, कृष्णनाथ दिवकर, महेश पणशीकर, राजू नाईक, अनिल नाईक, रत्नकांत म्हार्दोळकर, अनंत नाईक, फोंडय़ाचे मगो नेते डॉ. केतन भाटीकर, वेलींग प्रियोळचे जिल्हा सदस्य दामोदर नाईक, कुर्टीच्या जिल्हा सदस्या प्रिया च्यारी, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, वाडी तळावलीचे सरपंच दिलेश गावंकर, दुर्भाट आगापूरच्या सरपंच सरोज नाईक, कुंडईचे सरपंच रामू नाईक, फोंडय़ाच्या नगरसेविका गिताली तळावलीकर, वेलींग प्रियोळचे सरपंच पांडूरंग गावडे. बांदोडा पंचायत मंडळ तसेच फोंडा तालुक्यातील सर्व पंचायतींचे आजी माजी सरपंच व पंच सदस्य शिवप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आमदार सुदिन ढवळीकर
बांदोडा पंचायत व माहिती आणि प्रसिध्दी खात्याच्या मंत्र्यांना घेऊन पत्रकार परिषद घेणे आवश्यक होते. मात्र तसे केले नाही. युगपुरूष म्हणून ओळखणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिवजयंती म्हणजे लोकोत्सव आहे. ही महाराजांची जयंती एकत्रीत व संघटीतपणे भारतभर साजरी केली जात आहे. मात्र सरकारने महाराजांच्या विचाराने भविष्याचे मार्गक्रमण करण्याचे सोडून त्यांच्याच विंचाराना फाटा दिला आहे. मगो पक्षाच्या माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या कारकिर्दीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाची स्थापना झाली होती. त्यावेळी आपण उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी होता. तेव्हा पासून आम्ही हा कार्यक्रम अनुभवत आहोत. शिवाजीच्या विचारांमूळे नवं चैतन्य आमच्यामध्ये आहे. त्यांच्याच प्रेरणेने लोकप्रतिनिधी कार्य करणे गरजेचे आहे. मात्र या कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यानी वेगळाच पायंडा घातलेला आहे. असे पूढे बोलताना आमदार श्री. ढवळीकर म्हणाले.
सरपंच राजेश नाईक
छत्रपती शिवाजी महारांजांचे विचार पूढे नेण्यासाठी व त्यांच्या विषयी असलेला अभिमान बाळगुन आम्ही बांदोडा पंचायत ही शिवजयंती मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्या अधिपत्याखाली गेली दोन वर्षे साजरी करीत आहोत. मुख्यमंत्र्यानी यांची नोंद घेणे गरजेचे होते. मात्र त्यांनीच वेगळा पायंडा घालून बांदोडा पंचायतीचा मान नाकारलेला आहे. कुठल्याच गोष्टीत पंचायतीला माहिती प्रसिध्दी खाते विश्वासात घेत नसल्यामूळे आम्ही हा वेगळा कार्यक्रम करीत आहोत. पंचायतेने शिवजयंतीवर बहिष्कार घातलेला नाही. फक्त आम्ही आमची मुख्यमंत्र्यांना अनुपस्थिती दाखवीत आहे. गेली दोन वर्षे बांदोडा पंचायतीला सरकार मान देत नसल्याची खंत व्यक्त केली.