वार्ताहर /मडकई
बांदिवडे बंदर येथील श्री रामपुरूष गौडपुरूष सतीदेवी देवस्थानच्या शिमगोत्सवानिमित्त श्री रामपुरूष गौडपुरूष नाटय़झंकार निर्मित सं. ‘वस्त्रहरण’ नाटय़प्रयोग बुधवार दि. 23 रोजी रात्री 10.15 वा. बंदर येथे सादर करण्यात येणार आहे.
गोव्याच्या नाटय़ इतिहासातील बुजुर्ग, दिग्गज नाटय़दिग्दर्शक कै. पांडुरंग उर्फ बाप्पा फडते यांचे सुपुत्र मुंबई येथे वास्तत्यास असलेले श्रीपाद फडते यांनी सं. ‘वस्त्रहरण’ या नाटकाचे शिवधनुष्य सुंदररित्या पेललेले आहे. श्रीपाद पांडुरंग फडते यांनी सतत रंगभूमीवर कलाकार व नृत्यदिग्दर्शक म्हणून स्वतःची छाप पाडताना अनेक पैलू उलगडून दाखविलेले आहेत. अस्सल मालवणी भाषेतील या सं. ‘वस्त्रहरण’ नाटकाचे लेखन कै. गंगाराम गवाणकर यांनी केले होते. या नाटकातील मूळ भूमिका दिग्गज कलाकार स्व. मच्छांद्र कांबळी यांनी साकारल्यानंतर हे नाटक एवढे तुफान चालले की, या नाटकाने 5000 प्रयोग सादर करून नाटय़इतिहासात एक वेगळे स्थान निर्माण केले. 1975 साली रंगभूमीवर आलेल्या या नाटकात महाराष्ट्रातील मोठमोठय़ा कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. डॉ. काशिनाथ घाणेकर यांनीही यात अर्जुनाची भूमिका साकारली होती. नाटय़कलाकार श्रीपाद फडते यांनी नव्या ढंगात नृत्याचा साज चढवून रंगभूमीवर आणलेल्या या नाटकात अविनाश पुरसो फडते, नंदनराज राजेंद्र फडते, सम्राट फडते, प्रणव प्रसाद वळवईकर, समीर रामराव फडते, गोपाळ फडते, मिथील फडते, संतोष हळर्णकर, सुधांशु फडते, पियुष प्रताप फडते, शेखर फडते, उदय फडते, सर्वेश फडते, सिद्धांत फडते, राजेंद्र फडते, दिपाली फडते, दुर्वा वळवईकर, रीमा फडते आणि प्रमुख भूमिकेत श्रीपाद फडते हे आहेत. या नाटकासाठी रंगभूषा तेली फडते तर प्रकाशयोजना भोजराज फडते यांची आहे.