बांदा भाजपची संकल्पना
प्रतिनिधी / बांदा:
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्य हातावर पोट असणाऱया लोकांचे मोठे हाल होत आहे. या कुटुंबांना विविध संघटना, राजकीय पक्ष व शासनाचे प्रतिनिधी मदत करीत आहेत. याच अनुषंगाने बांदा भाजपतर्फे एक अभिनव उपक्रम मंगळवारी बांद्यात राबविण्यात आला. येथील रास्त धान्य दुकानाजवळ मिळालेल्या धान्यातील ‘एक मूठ धान्य गरिबांसाठी’ असा हा उपक्रम होता.
या धान्य दुकानावर आलेल्या नागरिकांनी आपल्याला मिळालेल्या धान्यातून एक मूठ धान्य याठिकाणी ठेवण्यात आलेल्या पोत्यांमध्ये दान म्हणून देत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये प्रत्येकी एक मूठ गहू व तांदुळ जमा करण्यात आले. बांदा परिसर हा नेहमी गरजवंताच्या मदतीसाठी धावणारा अशी एक वेगळी ओळख आहे. त्या ओळखीला साजेल असे प्रत्येकाने एका मुठीपेक्षाही धान्य गरिबांसाठी दातृत्व म्हणून दिले. भाजप सोशल मीडिया सावंतवाडी तालुका अध्यक्ष बाळा आकेरकर व तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी जि. प. सदस्या श्वेता कोरगांवकर, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, श्याम मांजरेकर, शहरअध्यक्ष राजा सावंत, मनोज कल्याणकर, बाबा काणेकर, आबा धारगळकर, ज्ञानेश्वर सावंत, प्रवीण नाटेकर, बाबल नार्वेकर, मंगल मयेकर, अरुणा सावंत, बबिता नार्वेकर या सर्वांच्या सहभागातून एक अनोखी संकल्पना बांदा शहर भाजपतर्फे धान्य सोसायटीच्या ठिकाणी राबविण्यात आली.