भाजी वाहतूक करणाऱया टेम्पोत दारू
प्रतिनिधी / बांदा:
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा दारू वाहतूक करणाऱया टेम्पोवर बांदा पोलिसांनी कारवाई केली. खंडाळा ते गोवा भाजी पोहोचून परतत असताना क्रेटच्या खाली महागडी दारू लपवून घेऊन जात असताना तपासणीदरम्यान उघड झाले. या कारवाईत सुजित हनुमंत भोसले (27) व अजिंक्य पोपट भोसले (23 दोघही रा. शिवाजीनगर-खंडाळा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत साडेतीन लाखाचा मुद्देमाल बांदा पोलिसांनी ताब्यात घेतला.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱया वाहनांना गोव्यात व गोव्यातून सिंधुदुर्गात प्रवेश दिला जातो. बांदा पोलिसांच्या सटमटवाडी येथील नाक्यावर गाडय़ांची तपासणी करीत असताना गोव्याहून खंडाळय़ाच्या दिशेने भाजी वाहतूक करणारा टेम्पो (एमएच 11 – सीएच 7155) आला असता येथील कर्मचारी विजय जाधव व महेश भोई यांनी तपासणीसाठी थांबविला. गाडीची तपासणी केली असता क्रेटच्या खाली गोवा बनावटीच्या महागडय़ा दारूचे तीन बॉक्स ठेवल्याचे आढळून आले. यामध्ये दारूची किंमत 40 हजार व गाडीची किंमत तीन लाख असा एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई सहा.पोलीस निरीक्षक ए. बी. बाबर, पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव, महेश भोई, ए. बी. पवार, ए. बी नाईक यांनी केली. संचारबंदीच्या काळातही अत्यावश्यक सेवेच्या वाहनांमधून अशी बेकायदा वाहतूक होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.