स्थावर मालमत्ता नोंदणीसाठी विशेष मोहीम
16 फेब्रुवारीला बैठकीचे आयोजन
प्रतिनिधी / बांदा:
बांदा शहरातील मालकी हक्काच्या स्थावर मालमत्तेच्या नोंदणीसाठी शहरात जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाच्यावतीने सिटी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भात भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक डॉ. विजय वीर यांनी बांदा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अक्रम खान यांची भेट घेतली. शहरातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्डसंदर्भात माहिती मिळावी, यासाठी मंगळवारी 16 फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता शहरातील नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
बांदा शहरात यापूर्वी 1988 मध्ये सिटी सर्व्हे करण्यात आला होता. मात्र, यासंदर्भात माहिती अपडेट करण्यात आली नव्हती. जिह्यातील नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात भूमी अभिलेखकडून सिटी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड (मालमत्ता उतारा) ऑनलाईन देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये मालमत्तेचा पुरावा म्हणून जमीन व बांधकाम केलेले घर यांचा मालमत्ता उताऱयात समावेश असणार आहे.
शासनाने दुहेरी मालकी हक्क बंदी आदेश दिल्याने भविष्यात सातबारा व असेसमेंट (घरपत्रक उतारा) ग्राह्य धरला जाणार नाही. यासाठी प्रॉपर्टी कार्ड महत्वाचा पुरावा ठरणार आहे. यामुळे सिटी सर्वेक्षण करून नागरिकांनी प्रॉपर्टी कार्ड उतारा घ्यावा, असे आवाहन डॉ. वीर यांनी केले. यावेळी सरपंच अक्रम खान व ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर यांनी ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
यावेळी भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक प्रियदा साकारे, निमतानदार भालचंद्र सावंत, भूकरमापक रवींद्र चव्हाण, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामविस्तार अधिकार डी. एस. अमृतसागर उपस्थित होते. 16 रोजी ग्रामपंचायत सभागृहात होणाऱया बैठकीसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून शंका निरसन करावे, असे आवाहन सरपंच खान व डॉ. वीर यांनी केले आहे.