कॅन्टरमध्ये लोखंडी सळय़ेंच्या आत आढळले दारुचे बॉक्स : बांदा पोलिसांची चेकनाक्यावर कारवाई
प्रतिनिधी / बांदा:
गोव्यातून गुजरातकडे कॅन्टरमधून केल्याजाणाऱया अवैध गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली. कॅन्टरमध्ये लोखंडी सळय़ांच्या आत दारुचे बॉक्स भरण्यात आले होते. या कारवाईत 20 लाख 34 हजार रुपयांच्या दारुसह 12 लाख रुपये किमतीचा कॅन्टर जप्त करण्यात आला. काळोखाचा फायदा घेत कॅन्टर चालक व क्लीनर जंगलातून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बांदा – पत्रादेवी चेकपोस्टवर करण्यात आली. गेल्या काही महिन्यातील बांदा पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा – पत्रादेवी चेकपोस्टवर गोव्यातून येणारा कॅन्टर (जीजे 06 एझेड 5535) तपासणीसाठी थांबविण्यात आला. यावेळी चालकाने लोखंडी अँगल असून गुजरातकडे जात असल्याचे सांगितले. मात्र, नाक्यावरील पोलीस कर्मचारी राजेंद्र शेळके यांना संशय आला. कॅन्टरची अधिक तपासणी केली असता लोखंडी अँगल खाली दारुचे बॉक्स भरलेले आढळून आले. यावेळी अंधाराचा फायदा घेत चालक व क्लीनर जंगलात पळून गेले. त्यांचा शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत.
कॅन्टरमधून गोवा बनावटीच्या दारुचे तब्बल 259 बॉक्स जप्त करण्यात आले. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत 20 लाख 34 हजार रुपये इतकी आहे. तसेच सुमारे 12 लाख रुपयांचा कॅन्टर असा एकूण 32 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, राजेंद्र शेळके, राऊळ यांनी केली. अधिक बांदा पोलीस करीत आहेत.