प्रतिनिधी /बेळगाव :
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही विणकर व्यवसाय करत आहे. मात्र, आम्हाला सरकारकडून कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. बांधकाम कामगारांप्रमाणेच आम्हालाही सर्व सुविधा द्याव्यात, अशी मागणी विणकर कामगार आणि विणकर व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कर्ज वसुलीसाठी मायक्रो फायनान्सधारक आम्हाला त्रास देत आहेत. आमचा व्यवसाय बंद असल्यामुळे आम्ही कर्ज भरू शकत नाही. संबंधित मायक्रो फायनान्सधारकांना मुदत वाढवून देण्यास सांगावे. याचबरोबर संपूर्ण कर्जमाफी करावी. 2018 मध्ये सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. अनेक विणकरांना त्याचा काहीच फायदा झाला नाही. तेव्हा संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात सरकारने विणकरांना 2 हजार रुपये मदत केली आहे. मात्र, ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे. तेव्हा किमान 10 हजार रुपये मदत करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. 55 वर्षे काम करणाऱया विणकरांना 5 हजार रुपये पेन्शन द्यावी. राज्यामध्ये जवळपास 15 विणकरांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना केवळ दोन लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यांना किमान 10 लाख रुपये आर्थिक मदत करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवलिंग टरकी, सुधीर रुकाजी, बबन कांबळे, श्रीकांत कुंभार, अशोक कुंभार, बाळासो ढांगर, दत्तात्रेय खटवे, सचिन कुंभार, शरद कुंभार, सौरभ कुंभार, शांतगौडा भीमराई यांच्यासह विणकर समाजाचे नागरिक उपस्थित होते.