आढावा बैठकीत मनपा आयुक्तांची नगरयोजना विभागाला सूचना : तीन दिवसांत अर्ज निकालात काढणे आवश्यक
प्रतिनिधी / बेळगाव
इमारत बांधकाम परवानगी घेण्यासाठी मनपाच्या महसूल विभागाकडून ना-हरकत दाखला घेतला जातो. मात्र महसूल विभागात अर्ज निकालात काढण्यास विलंब होत असल्याची माहिती महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांना देण्यात आली. दोन दिवसांत अर्ज निकालात काढण्याची सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱयांना करण्यात येईल. पण इमारत बांधकाम परवानगीस विलंब करता कामा नये, असा इशारा नगरयोजना विभागाच्या अधिकाऱयांना आयुक्तांनी बजावला.
महापालिकेच्या विविध विभागांची माहिती आणि कामकाजाचा आढावा घेण्याची मोहीम महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांनी हाती घेतली आहे. गुरुवारी नगरयोजना विभागाच्या अधिकाऱयांची बैठक घेऊन इमारत बांधकाम परवानगीबाबतचा आढावा आयुक्तांनी घेतला.
58 अर्ज प्रलंबित
यावेळी इमारत बांधकाम परवानगीसाठी आलेल्या अर्जांची माहिती जाणून घेतली. सध्या इमारत बांधकाम परवानगीकरिताचे 58 अर्ज प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. तसेच बांधकाम परवानगीच्या प्रक्रियेची माहिती आयुक्तांना देण्यात आली. इतके अर्ज प्रलंबित राहण्याचे कारण काय? असा मुद्दा महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांनी नगरयोजना अधिकाऱयांना विचारला. तसेच नागरिकांचे अर्ज वेळेत निकालात काढावेत, अशी सूचना केली.
इमारत बांधकाम परवानगी देण्यास विलंब होत असल्याने अर्जांची मुदत संपत आहे. परिणामी अर्जदारांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे वेळेत अर्ज निकालात काढा, अशी सूचना केली. इमारत बांधकाम परवानगीसाठी भूखंडाचा मालमत्ता कर भरला आहे का? याची माहिती घेणे बंधनकारक आहे. त्याकरिता इमारत बांधकाम परवानगीचे अर्ज महसूल विभागात पाठविण्यात येतात. त्या ठिकाणी विलंब होत असल्याने वेळेत इमारत बांधकाम परवानगी देता येत नसल्याची माहिती आयुक्तांना देण्यात आली.
सकाल योजनेंतर्गत केवळ तीन दिवसांत महसूल विभागाकडून अर्ज निकालात काढणे आवश्यक आहे. मग इतका उशीर का होतो, असा जाब विचारला. तसेच याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱयांना सूचना करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त घाळी यांनी
सांगितले. तसेच इमारत बांधकाम परवानगीचे अर्ज विनाविलंब निकालात काढा व अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवण्याची सूचना आयुक्तांनी केली. सदर बैठक दुपारी 2 वाजता सुरू झाली. पण वेळेअभावी तहकूब करून सायंकाळी घेण्याचे ठरले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱयामुळे बैठक होऊ शकली नाही. यावेळी नगरयोजना अधिकाऱयांसह विभागीय कार्यालयातील अभियंते उपस्थित होते.