प्रतिनिधी / बेळगाव
इमारत बांधकाम परवानगी तिढा अद्यापही सुटला नाहा.r निर्माण-2 मधील त्रुटी दूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र समस्या जैसे थे असल्याने इमारत बांधकाम परवानगी मिळणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे नागरिकांना महापालिका कार्यालयाच्या पायऱया झिजवाव्या लागत आहेत. निर्माण-2 मधील त्रुटींचे निवारण कधी होणार?असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
इमारत बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यात येतात. मात्र सदर प्रणाली मागील काही दिवसांपासून नादुरुस्त होत आहे. अनेकवेळा काम बंद ठेवून दुरूस्ती करण्यात आली. पण समस्या जैसे थे आहे. मागील महिन्यात पंधरा दिवस निर्माण-2 द्वारे अर्ज स्वीकारण्याचे बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर ऑफलाईनद्वारा अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण त्यानंतरही यातील अडचणींचे निवारण झाले नाही. निर्माण-2 ऑनलाईन प्रणालीत वारंवार अडचणी येत आहेत. तर कधी सर्व्हर डाऊनचा फटका बसत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली. मात्र यामध्ये वारंवार बिघाड होत असल्याने ऑनलाईन इमारत बांधकाम परवाना नको, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
निर्माण-2 मधील समस्यांचे निवारण करून मागील सोमवारपासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाले. मात्र अजूनही सर्व्हरडाऊन तसेच लॉग इन होत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. सोमवारनंतर नागरिकांनी निर्माण-2 द्वारे अर्जाच्या मुव्हेमेंटबद्दल पाहणी करण्यासाठी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला असता. लॉग इन होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून या प्रणालीमध्ये वारंवार बिघाड घडत आहेत. त्यामुळे इमारत बांधकाम परवान्यासाठी अर्ज केलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. या प्रणालीतील अडथळे कधी दूर होणार व बांधकाम परवानगी कधी मिळणार? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. बांधकाम परवान्यातील अडचणी दूर कराव्यात, अन्यथा ऑफलाईन अर्ज स्वीकारून बांधकाम परवाने देण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.