प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेत गेल्या सहा महिन्यात प्रथमच बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांनी बांधकाम समितीची सभा ऑन लाईन घेतली. या सभेत 86 विषयांना मंजुरी देण्यात आली. हे विषय सुमारे 3 कोटीच्या विकासकामाचे असून प्रत्येक विषयाच्या फाईलवर लेखापाल आरती नांगरे-पाटील यांनी मारलेल्या शेऱयावरून त्यांना नगरसेवकांनी चांगलेच फैलावर धरले. नगरसेवक अण्णा लेवे यांनी जीआर वाचून दाखवून शेरा काय मारला त्याचा खुलासा मागवला.
सभापती मिलिंद काकडे यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम समितीची सभा पार पडली. यावेळी नगरसेवक आण्णा लेवे, राजू भोसले, धनंजय जांभळे, मनोज शेंडे, शेखर मोरे-पाटील, मनीषा काळोखे, लीना गोरे, सुनीता नलावडे आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला मिलिंद काकडे यांनी कोरोनाच्या कारणाने सभा घेता आली नाही असे सांगून सभा सुरू केली. अण्णा लेवे यांनी पालिका प्रशासनाने केलेल्या कामावरून वाभाडे काढले. लेखापाल आरती नांगरे-पाटील यांनी प्रत्येक फाईलवर शेरा मारला आहे. शेरा मारताना त्यांनी जीआर पूर्णपणे वाचला गेला नाही. त्यांनी जीआर अभ्यासाला नसल्याने आज शहराची विकासकामे खोळंबली आहेत. त्यांनी 23 मे आणि 9 सप्टेंबर ला आलेल्या दोन्ही जीआर वाचून खुलासा सादर करावा अशी विनंती केली. त्यावरून आरती नांगरे -पाटील यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यांचा आवाज पोहचू शकला नाही. सर्व विषय मंजूर करण्यात आले.