प्रतिनिधी/शाहूवाडी
बांबवडे तालुका शाहूवाडी येथे बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या निषेधार्थ शाहूवाडी तालुक्यात कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. तर प्रशासनाने सतर्कता घेऊन पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
रविवारी मध्यरात्री बांबवडे तालुका शाहूवाडी येथील मुख्य चौकात अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला होता. या घटनेचे पडसाद सोमवारी दिवसभर पसरले होते. प्रशासन आणि शिवप्रेमी त्याचबरोबर शिवसैनिक यांच्यात विविध विषयावर चर्चा होऊन अखेर विधिवत पूजा करून सदर पुतळा हटविण्यात आला. मात्र याचे पडसाद चांगलेच उमटले असून या निषेधार्थ संपूर्ण शाहुवाडी तालुका मंगळवारी बंद ठेवण्यात आला. दरम्यान तालुक्यातील बांबवडे, मलकापूर सह सर्व बाजारपेठ बंद ठेवून या बंदमध्ये सर्वांनी सहभाग घेतला.
बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता घेतली असून बांबवडे सह सरूड, मलकापूर, आंबा, तुरूकवाडी, आदी विविध ठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर महसूल प्रशासनाने ही आपली यंत्रणा सतर्क पाठवली होती.