क्रीडा प्रतिनिधी /मडगांव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज गुरूवारी बांबोळीच्या ऍथलेटीक स्टेडियमवर जमशेदपूर एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यात लढत होणार आहे. तळातील प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजयी मार्गावर परतण्याचे लक्ष्य सहाव्या स्थानावरील जमशेदपूर एफसीने ठेवले आहे.
या सामन्यात जमशेदपूर एफसीचे पारडे निश्चितच जड आहे. आठव्या हंगामात त्यांची कामगिरी संमिश्र आहे. त्यांच्याकडे अनेक गुणवत्तापूर्ण खेळाडू आहेत. मात्र, ओवेन कॉयल यांच्या प्रशिक्षकापदाखालील क्लबला मागीत तीन सामन्यांतून फक्त दोन गुण प्राप्त करता आले आहेत. ओडिशा एफसीविरूद्ध 4-0 असा मोठा विजय संपादन केल्यानंतर त्याना बेंगलोर एफसी आणि केरळ ब्लास्टर्सविरूद्ध बरोबरी पाहावी लागली असून मागील लढतीत चेन्नईन एफसीकडून एक गोलने पराभूत व्हावे लागले आहे.
जमशेदपूर एफसीने 9 सामन्यांतून तीन सामने जिंकले असून चार सामने बरोबरीत सोडविले आहेत. त्यांचे 13 गुण झाले आहेत. नॉर्थईस्टवर विजय मिळविल्यास जमशेदपूर एफसीला गुणतालिकेत प्रथम चार संघांत स्थान मिळविण्याची संधी आहे. त्यांच्या ग्रेग स्टीवर्टचा सर्वोत्कृष्ट खेळ हे जमशेदपूर एफसीच्या उंचावलेल्या सांघिक खेळाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. आमचा खेळ चांगला होत आहे. मात्र, चेन्नईन एफसीविरूद्धच्या पराभवातून आम्हाला बोध घेतला पाहिजे. आम्ही गोल करण्याच्या कित्येक संधी गमविल्या. खेळाचा स्तर उंचावून विजयी मार्गावर परतण्याची आमच्यात क्षमता आहे, असे जमशेदपूर एफसीचे प्रशिक्षक ओवेन कॉयल म्हणाले.
नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचे 9 सामन्यांतून 8 गुण असून ते दहाव्या स्थानावर आहेत. मागील लढतीत त्यांनी गतविजेता मुंबई सिटी एफसी संघाला 3-3 असे बरोबरीत रोखले. या बरोबरीमुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. जमशेदपूर एफसी हा कडवा प्रतिस्पर्धी आहे. मुंबई सिटी एफसीप्रमाणे सर्व आघाडय़ांवर सर्वोत्तम खेळ करण्याला आमचे प्राधान्य असेल. आम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन मैदानात उतरू, असे नॉर्थईस्टचे प्रशिक्षक खलीद जमील म्हणाले.