क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज मंगळवारी बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर एफसी गोवाला नमविणाऱया मुंबई सिटी एफसीचा सामना ईस्ट बंगाल संघाशी होणार आहे. सध्या मुंबई सिटी एफसीचे दोन सामन्यांतून तीन गुण झाले आहेत तर ईस्ट बंगाल आपल्या पहिल्या सामन्यात मोहन बागानकडून 2-0 गोलांनी पराभूत झाल्याने त्यांचा गुणफलक कोराच आहे.
लहान लहान पासेसचा अवलंब करून खेळणाऱया सर्जिओ लोबेराचा संघ आपल्या मागील सामन्यात एफसी गोवाविरूद्ध नशीबाने जिंकला होता. दहा खेळाडूंनीशी खेळणाऱया एफसी गोवाने त्याना दिलेली झुंज निश्चितच वाखाणण्याजोगी होती. मुंबई सिटी एफसीने दोन्ही सामन्यात जरी वर्चस्व ठेवले असले, तरी गोल नोंदविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला आहे. दोन सामन्यांतून फक्त एक गोल व तोही पेनल्टीवर त्यांनी केला आहे. ऍडम फोंड्रे आणि हय़ुगो बुमूस यांची परत एकदा मुंबईच्या आघाडीफळीत मदार असेल. आता स्ट्रायकर बार्थोलोमीव ओगबेचे याला पहिल्या अकरात स्थान मिळणार का, हे पाहावे लागेल.
आम्हाला आम्ही मागील दोन सामन्यांत केलेल्या चुकीतून बोध घ्यावा लागेल. मला खेळावर ताबा ठेवावा लागेल आणि संधी उपलब्ध कराव्या लागतील. ईस्ट बंगाल हा एक नियोजनबद्धरित्या बांधलेला संघ आहे. त्यांच्याविरूद्ध बचाव आणि आघाडीफळी फोडण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागेल, असे सर्जिओ लॉबेरा म्हणाले.
हा सामना मुंबई सिटी एफसीचा डिफेंडर मंदार राव देसाई याच्यासाठी संस्मरणीय असेल. त्याचा हा आयएसएलमधील शंभरावा सामना असेल. जास्तीत जास्त सामने खेळण्यासाठी मिळणे हे फुटबॉलपटूसाठी महत्वाचे आहे. मी ज्या फुटबॉलपटूसमवेत तसेच या लीगमध्ये ज्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळलो, त्यांचा मी ऋणी असल्याचे मंदार राव देसाई म्हणाला. कोलताता डर्बीत जरी प्रशिक्षक रॉबी फाऊलरचा ईस्ट बंगाल संघ हरला असला तरी एटीके मोहन बागानला विजयासाठी त्यांनी चांगलेच झुंजविले. फाऊलरची मदार ऍथनी पीलकिंग्टन आणि मॅटी स्टिनमॅन यांच्यावर अवलंबवून आहे. हे दोघेही आज मुंबई सिटी एफसीला भारी ठरू शकतात. आम्ही आयएसएलमध्ये नवीन आहोत. एकत्रित सरावाची संधीही आम्हाला कमी मिळाली, असे फाऊलर म्हणाले.