वार्ताहर/ जमखंडी
दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या बागलकोटमधील मुधोळ येथील 33 वर्षीय युवकामध्ये कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. तर बागलकोटमध्ये 41 वर्षीय महिलेला घराशेजारील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने संसर्ग झाला आहे. त्यामुळे या जिल्हय़ात आतापर्यंत कोरोनाचे 5 रुग्ण आढळले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी या जिल्हय़ात दोन रुग्ण आढळून आले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. राजेंद्र यांनी दिली.
दिल्ली निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमात भाग घेतलेल्या व्यक्तिशी संपर्कात आलेल्या मुधोळ येथील मदरशामधील 33 वर्षाच्या क्यक्तिला कोरोनाची बाधा झाली आहे. बागलकोट येथील कोरोनाने मृत्यू पावलेल्या 75 वर्षांच्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुधोळ येथील कोरोना बाधित व्यक्तिसह एकूण 10 जण डिसेंबर 23 रोजी गुजरातहून आले असून त्यांनी दिल्ली येथील तबलिग जमात कार्यक्रमात भाग घेतला नसला तरी दिल्लीहून आलेल्या जमातच्या 15 जणांच्या संपर्कात दि. 27 फेब्रुवारीला आले होते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
मुधोळ येथील मदरशामधील 25 व्यक्तिंचे स्वॅब प्रयोगशाळेला पाठविण्यात आले असता 23 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह तर एक व्यक्ती पॉझिटिव्ह असून अन्य एकाचा रिपोर्ट येणे बाकी आहे. या 25 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनाबाधित व्यक्तिच्या निवास परिसरात संपूर्ण संचारबंदी असून या भागात आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख लोकेश जगलासर यांनी सांगितले.