वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ातील मुधोळ येथे धर्म प्रचाराकरिता आलेल्या दिल्लीच्या 15 व निजामुद्दिन तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका व्यक्तीसह एकूण 19 जणांचे नमुने कोविड-19 तपासणीकरिता पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. राजेंद्र यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुस्लीम धर्म प्रचाराकरिता बागलकोट जिल्हय़ात डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान काहीजण आले होते. त्यापैकी आता 15 जणांचे येथे वास्तव्य असून त्यांची आरोग्य चाचणी करण्यात आली. दिल्ली येथील निजामुद्दिन तबलिग जमात कार्यक्रमात भाग घेऊन बागलकोटला चार जण परतल्याची माहिती उपलब्ध झाली असली तरी अन्य कोणी भाग घेतला असेल तर त्यांनी स्वतःहून जिल्हा हॉस्पिटलमध्ये येऊन आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन डॉ. राजेंद्र यांनी केले.
जिल्हय़ात लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केलेली सात प्रकरणे दाखल झाली असून एका व्यक्तीने अफवा पसरविल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जिल्हय़ात एकूण 700 दुचाकी वाहने अनावश्यक फेऱया मारताना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जिल्हा वरि÷ पोलीस अधिकारी लोकोश जगलासर यांनी दिली. जमखंडीतही विनाकारण रस्त्यातून फिरणारी 30 दुचाकी वाहने पीएसआय गोविंदगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जप्त करण्यात आली आहेत.