वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ातील हुनगुंद तालुक्यात चौघा चोरटय़ांना अटक करून त्यांच्याजवळील 85 मोटारसायकली व एक पाण्याचा टँकर अशी अंदाजे 52 लाख रुपयांची वाहने पोलिसांनी जप्त केली.
हुनगुंद शहराजवळील साईक्रॉसजवळ पहाटेच्या वेळेस चौघेजण संशयास्पदरित्या फिरत असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील कोप्पळ, इलकल कारटगी, मुदगल, सिंधनूर, मुद्देबिहाळ आदी ठिकाणी मोटारसायकलींची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून 85 मोटारसायकली अंदाजे किंमत 51 लाख रुपये व एक पाण्याचा टँकर अंदाजे किमत 1 लाख रुपये अशी एकूण 52 लाख रुपयांची वाहने जप्त केली.
बागलकोट जिल्हा पोलीस अधीक्षक लोकेश जगलासर यांच्या मार्गदर्शनाखाली, डीएसपी चंद्रकांत नंदरेड्डी यांच्या नेतृत्त्वाखाली सीपीआय होसकेरप्पा के. व सोमनगौड गौडर, पीएसआय एस. आर. नायक, पोलीस एन. एल. वालिकार, आय. एम. हिरेगौडर, एस. बी. होसमनी, आनंद गोलप्पनवर, जी. ए. पवार, सी. टी. लमाणी, व्ही. डी. गौडर, ए. एल. नदाफ, रजाक गुडदारी, बी. एस. भावीकट्टी, संगाप्पा तुप्पद, विजय राठोड आदींनी कारवाई केली. या कारवाईबद्दल बागलकोट एसपी लोकेश जगलासर यांनी पोलीस पथकाचे अभिनंदन करून योग्य बक्षीस देण्याचे जाहीर केले.