सोसायटी फोडून 51 हजार रुपये लंपास : चोरटय़ांची करामत सीसीटीव्हीत कैद
प्रतिनिधी / बेळगाव
रविवारपेठसह मुख्य बाजारपेठेत चोऱयांचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे व्यापारी हैराण झाले आहेत. एका सोसायटीमधून चोरटय़ांनी 51 हजार रुपये लांबविल्याची घटना घडली असून मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. चोरटय़ांची करामत सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली असून डोक्यावर पोते घालून त्यांनी सोसायटीत प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे.
या सोसायटीसह परिसरात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. बुधवार दि. 23 डिसेंबर रोजी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारपेठ परिसरातील सहय़ाद्री को-ऑप. सोसायटीमधून कडीकोयंडा तोडून 51 हजार 795 रुपये रोकड पळविली आहे. घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्याचदिवशी मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चोरटय़ांची करामत सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहे. डोक्यावर पोते घालून चोरटय़ांनी सोसायटीत प्रवेश केला आहे. फुटेजवरुन चोरटय़ांचा माग काढण्यात येत आहे. पोलिसांनी ठशांचे नमुने मिळविले असून यासंबंधी मार्केट पोलिसांशी संपर्क साधला असता तपास सुरू असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
मुख्य बाजारपेठेत चोरटय़ांचा धुमाकूळ सुरूच आहे. यापूर्वी घडलेल्या चोरी प्रकरणांचाही तपास लागला नाही.
अंधारामुळे चोऱया वाढल्या
वाढत्या चोऱयांमुळे व्यापारी हैराण झाले आहेत. रविवारपेठ, कांदा मार्केट, परिसरात अधूनमधून चोरीचे प्रकार सुरूच आहेत. या परिसरात सध्या अंधाराचे साम्राज्य आहे. गेल्या चार महिन्यांपासून हायमास्ट दिवे बंद आहेत. ते सुरू करण्यासंबंधी व्यापाऱयांनी संबंधित अधिकाऱयांना वारंवार विनंती करूनही अद्याप ते सुरू केलेले नाहीत. या अंधाराचा फायदा घेत चोरटय़ांनी धुमाकूळ सुरू केला आहे.