प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील गल्लोगल्ली आणि रस्तोरस्ती सायंकाळच्यावेळी परिसरत उजळून निघत आहे. सर्वत्र लावलेल्या आकाश कंदिलांनी परिसर जसा उजळला आहे तसाच मनामनातही चैतन्याचा उत्साह सळसळू लागला आहे. कोरोनाचे काळेकुट्ट तिमीर भेदून प्रकाशाच्या, तेजाच्या, दिशेने जाताना आशेचे सकारात्मक दीप प्रज्वलीत करणारी दिवाळी उंबरठय़ापाशी येऊन ठेपली आहे. अर्थातच बाजारपेठेत दिवाळीच्या सर्व साहित्याची आवक वाढली आहे.
दिवाळीची खऱया अर्थाने चाहुल देतात ते कंदिल. दीप हा तेजाचे प्रतिक आहे. दिवाळी म्हणजे आनंद आणि मांगल्याचे पर्व. म्हणूनच पाचही दिवस पणत्या, विद्युत माळा, दीपमाळा लाऊन आकाशस्थ पूर्वज आणि देवदेवतांना या आनंदाची वार्ता देण्याची परंपरा आहे.
आकाश कंदिलांच्या नमुन्यांमध्ये दरवषी नाविन्यपूर्ण भर पडते. कालानुरुप त्याच्यात बदल होत जातात. अगदी पूर्वी तेलाचे दिवे, पणत्या, मशालीची जागा, समई, निरांजन असा प्रवास होत होत आता त्यांची जागा आकाश कंदिलांनी घेतली आहे. आकाश कंदिल हा प्रामुख्याने कागदापासूनच बनविला जातो. परंतु आता मात्र त्यामध्ये प्लास्टीकची भर पडली आहे.
पारंपरिक आकाश कंदिल बांबुच्या काठय़ा (कामटय़ा) व रंगीत कागदापासून तयार केल्या जातो. कार्तिक महिन्यात सुर्यास्थाच्यावेळेला आकाश कंदिल लावाला, असे शास्त्र सांगते. शास्त्रानुसार घराच्या बाहेर अंगणामध्ये जमीन सारवून मध्यभागी लाकूड उभे करावे, त्यावर आठ पाकळय़ांचे दिव्याचे तयार केलेले यंत्र म्हणजेच आकाश कंदिल लावावा. म्हणजे अष्टदिशांना दिवा अर्पण केल्या प्रमाणे होईल, असेही शास्त्रान नमूद करण्यात आले आहे.
पूर्वीच्या काळी भूर्जपत्र किंवा झाडांची मोठी पाने एकमेकांना जोडून कमळाच्या आकारात दिवा करण्यात येत होता. आता त्याची जागा आकाश कंदिलांनी घेतली आहे. आकाश कंदिल लावण्याची प्रथा अन्य समाजातही आहे. रंगीत कागद, कार्डबोर्ड, बांबुच्या कामटय़ा वापरुन रंगीबेरंगी आकाश कंदिल तयार केले जातात. बेळगाव बाजारपेठेचा कानोसा घेता नेहमीच्या पारंपरिक आकाश कंदिलांप्रमाणेच आधुनिक साज असलेले आकाश कंदिलही उपलब्ध आहेत.
पिऱयामीड, ट्रीपल अनार हे यंदाच्या दिवाळीमधील आकाश कंदिलांचे वैशिष्टय़ आहे. यांची किंमत साधारण 80 ते 500 रुपये आहे. प्लास्टीकच्या दोन बाऊलचा वापर करुन मध्ये कागद लाऊन यावर सुबक नक्षीकाम केलेल्या आकाश कंदिलाची किंमत 500 रुपये आहे. चांदणी, करंजीचा आकाश कंदिल यांना आजही मागणी कायम आहे. करंजी ही लेकुरवाळी समजली जाते. करंजी केल्यानंतर परत परत त्याचे पाते उरते. याचा संबंध वृध्दीशी जोडला जातो. त्यामुळे करंजीचा आकाश कंदिल हा प्रामुख्याने खरेदी केला जातो.
फोल्डेड आकाश कंदीलही उपलब्ध
यंदा आकाश कंदिलाचे दर वाढले आहेत. प्रामुख्याने अहमदाबाद, सुरत, कोल्हापूर येथून आकाश कंदिल मागविले जातात. इतकेच नव्हे तर बॉक्समध्ये फोल्डेड किंवा डिसमेंटल करता येतील, असे आकाश कंदिल येत असून दिवाळीनंतर ते बॉक्समध्ये ठेवता येतात किंवा लॅम्पशेड म्हणूनही वापरले जाऊ शकतात.
शिवकुमार किणेकर
चिनी आकाश कंदिलांना नाकार
अलिकडे लोकांनी चिनी आकाश कंदिलांना नाकारलेले दिसते. प्रामुख्याने भारतीय बनावटीचेच आकाश कंदिल घेण्याकडे लोकांचा कल आहे. शिवाय पूर्वीच्या झिरमिळय़ा किंवा कागदी आकाश कंदिलांनाच अधिक मागणी आहे. कापडी आकाश कंदिल सुध्दा खरेदी केले जात आहेत. एकूणच पर्यावरण पुरक आकाश कंदिलांना मागणी असून साधारण 80 ते 500 रुपयांपर्यंत आकाश कंदिलांचा दर आहे.
राहुल उप्पीन