कोरोनामुळे शाळा सुरू होण्याबाबत संभ्रम अवस्था
प्रतिनिधी/ सातारा
जून महिना सुरू झाला असून सर्वत्र मान्सूनची चाहूल लागलेली आहे. याच महिन्याच्या 10 तारखेपर्यंत शाळा महाविद्यालये सुरू होतात. यंदा मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे दुकानातही शालेय साहित्य विक्रीसाठी आलेले नाही. दुकानदार उपलब्ध साहित्यांची विक्री करत आहेत.
कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून यांचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनकडून योग्य त्या उपाय योजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊनचे नियम तब्बल 60 दिवसानंतर शिथील करण्यात आलेले आहेत. परंतु गर्दी न करत सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नुकताच जून महिना सुरू झाला आहे. दरवर्षी याच महिन्याच्या 10 तारेखपर्यंत शाळा सुरू झालेली असते. बाजारपेठेत शालेय साहित्य मोठया प्रमाणावर दाखल झालेले असते. नव नवीन साहित्य मुलांना, पालकांना भुरळ पाडत असते. यंदा मात्र शाळा, महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. शाळेमध्ये मुलांची संख्या जास्त असल्याने वायसर पसरण्याचा धोका अधिक आहे. यांचा विचार करत ऑनलाईन शिक्षण पद्धत राबविण्याचा विचार करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर बाजारपेठेत शालेय साहित्य विक्रीसाठी आलेले नाही. शाळा सुरू होणार का असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. लॉकडाऊनमध्ये स्टेशनरी विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागला आहे. नवीन साहित्यामुळे तोटयात वाढ होईल म्हणून स्टेशनरी दुकानात गत वर्षीचे साहित्य आहे. ठोस निर्णय न झाल्याने पालकांनही खरेदीकडे पाठ फिरवली आहे. शाळा सुरू होण्याच्या मुहर्तावर बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे.