वार्ताहर / सांबरा
सध्या बेळगाव बाजारपेठेमध्ये दहा रुपयांची नाणी घेण्यास व्यापारी वर्गाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शेजारच्या महाराष्ट्र व गोवा राज्यांमध्ये दहा रुपयांची नाणी सर्रास वापरण्यात येत आहेत. बेळगाव शहरांमध्ये मात्र कोणीही दहा रुपयांची नाणी घेण्यास तयार नाहीत. दहा रुपयांचे नाणे चलनात आल्यानंतर अनेकांनी सदर नाण्यांचे आपल्याकडे संग्रह करून ठेवला होता.
मात्र बेळगाव शहरांमध्ये सदर नाणी बंद झाल्याची अफवा पसरल्याने दुकानदार व व्यापारीवर्ग नाणी स्वीकारण्यास टाळाटाळ करत होते. अशातच काही बँका देखील नाणी स्वीकारत नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत आणखीन भर पडत आहे. चलनात असलेली नाणी न स्वीकारणे म्हणजे हा गुन्हा होऊ शकतो. यासाठी प्रशासनानेही दहा रुपयांची नाणी वापराबाबत नागरिकात जागृता केली पाहिजे व जे दुकानदार दहा रुपयांची नाणी स्वीकारत नाहीत, अशांची तक्रार केल्यास त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते. यासाठी दहा रुपयांचे नाणे चलनात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
तसेच सध्या दहा रुपयांच्या नोटांचा बाजारपेठेत तुटवडा भासत आहे. त्यामुळे चिल्लर देणे दुकानदारांना मुश्कील जात आहे. अशातच असलेल्या नोटा खराब झाल्या असल्याने त्या नोटा कोणीही स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे गैरसोय होत आहे.