बेळगाव / प्रतिनिधी
शहराच्या विविध मार्गांवर सुरू असलेली विकासकामे… अर्धवट स्थितीत असलेले रस्ते… काही ठिकाणी सुरू असलेली एकेरी वाहतूक… दिवाळीसाठी बाजारात झालेली गर्दी यामुळे शनिवारी शहरात विविध ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. दिवाळी सणाच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. शहरात खरेदीसाठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडीतून बाहेर पडताना नागरिकांची दमछाक झाली.
शहरातील गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, कडोलकर गल्ली, पांगुळ गल्ली, समादेवी गल्ली, काकतीवेस रोडवर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे बाजारात आलेल्या नागरिकांना हातातील साहित्य सांभाळत गर्दीतून मार्ग काढावा लागला. बाजारात पादचाऱयांबरोबर वाहनांची संख्यादेखील वाढली होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
बाजारात सगळीकडे दिवाळीसाठी आकाश कंदील, रांगोळय़ा, पणत्या, फटाके व कपडय़ांची दुकाने सजली आहेत. फराळासाठी किराणा सामान, मिठाई, कपडे, कंदील खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली होती. बाजारात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी वर्दळ वाढलेली पाहायला मिळाली. शनिवारी सुटी असल्यामुळे लहान-थोरांना लागणाऱया सर्व वस्तुंची बाजारात रेलचेल आहे. त्यामुळे खरेदीसाठी तोबा गर्दी होत आहे.