सेन्सेक्स 1400 तर निफ्टी 432 अंकांनी कोसळला
वृत्तसंस्था/ मुंबई
ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे स्वरूप येण्याच्या बातमीने आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजार अचानकपणे गडगडला. बीएसई सेन्सेक्स 1400 अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 432 अंकांनी घसरण नोंदवत बंद झाला.
सोमवारी दिवसअखेर सेन्सेक्सचा निर्देशांक 1406 अंकांच्या घसरणीसह 45,553.96 तसेच निफ्टीचा निर्देशांक 432 अंकांच्या घसरणीसह 13,328.40 अंकांवर बंद झाला. सोमवारी दिवसभरात व्यवहारावेळी सेन्सेक्स 1500 अंकांहून अधिक खाली घसरला होता. मे 2020 नंतर सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात एकाच दिवसात एवढी मोठी घसरण झालेली आहे. यावर्षी मेमध्ये सेन्सेक्स 2 हजार अंकांच्याही खाली होता. कोरोनामुळेच सेन्सेक्स, निफ्टीत बहुतेक करून घसरण अनुभवायला मिळाली आहे. मागच्या आठवडय़ातही सेन्सेक्स, निफ्टी तेजीत होते.ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे स्वरूप येणार आहे. युरोपियन बाजार सुरूवातीला घसरणीसह सुरू झाले. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसला. शेअर बाजारात सोमवारी विक्रीचाच सपाटा अधिक दिसून आला. कमकुवत जागतिक संकेत तसेच कोरोना व्हायरस पुन्हा वाढण्याची बातमी शेअर बाजारावर विपरीत परिणाम करणारी ठरली. सुरूवातीच्या सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 200 अंकांच्या घसरणीसह 46,758.25 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टीही 66 अंकांच्या घटीसह 13,693.80 अंकांवर होता.
सोमवारी ओएनजीसीचे समभाग सर्वाधिक 9 टक्के इतके घसरले होते, यासाठी तेलाच्या जागतिक स्तरावरच्या किमतीत झालेली वाढ कारणीभूत ठरली आहे. टाटा मोटर्सचे समभागही 9 टक्के घसरले. 4 ते 7 टक्के समभागात घसरण झालेल्या कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, महिंद्रा आणि महिंद्रा, एसबीआय, एनटीपीसी, आयटीसी, ऍक्सीस बँक, पॉवरग्रिड, आयसीआयसीआय, सन फार्मा, भारती एअरटेल व बजाज फायनान्स यांचा समावेश होता.