एचडीएफसी बँक, इन्फोसिससह रिलायन्स मजबूत स्थितीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ात सोमवारी धुलिवंदनामुळे शेअर बाजाराला सुट्टी होती. मंगळवारी बीएसई सेन्सेक्सची आठवडय़ाची सुरूवात मजबूत कामगिरीने होऊन निर्देशांक तब्बल 1,128 अंकांनी वधारल्याचे पाहायला मिळाले. सदरची मजबूत स्थिती प्राप्त करण्यासाठी जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणासह एचडीएफसी बँक, एचडीएफसी, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागातील तेजीचा मोठा लाभ झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 1,128.08 अंकांनी वधारुन निर्देशांक 50,136.58 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 337.80 अंकांनी वधारुन निर्देशांक 14,845.10 वर स्थिरावल्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमध्ये दिवसभरात एचसीएल टेकचे समभाग चार टक्क्यांनी मजबूत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एनटीपीसी, नेस्ले इंडिया, टीसीएस आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग चार टक्क्यांनी नफा कमाईत राहिले आहेत. दुसऱया बाजूला महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, भारती एअरटेल आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग मात्र घसरणीमध्ये राहिले आहेत.
मंगळवारच्या सत्रात घसरणीचा भाग बाजूला सोडल्यास रुपया स्थिर राहिला आहे. याच दरम्यान डॉलरचा निर्देशांक मजबूत राहिला आहे. अमेरिकेमध्ये 10 वर्षात बॉण्डवर मोठा नफा झाला असून भारतामध्ये 10 वर्षात बॉण्ड परतावा मात्र स्थिर असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
अन्य घडामोडींचा प्रभाव
भारतीय शेअर बाजारातील वातावरण सकारात्मक राहण्याच्या संकेतामुळे सेन्सेक्समधील स्थिती मजबूत राहिली असून अन्य आशियाई बाजारामधील चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे बाजार नफा कमाईत राहिले आहेत. अन्य बाजारात युरोपीयन बाजार वाढीमध्ये राहिले असल्याचे पहावयास मिळाले आहेत.