सेन्सेक्समध्ये174 अंकांची तेजी ः विविध विक्रमांची नोंद
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी भारतीय शेअर बाजार मजबूत स्थिती प्राप्त करत बंद झाला आहे. दिवसभरात सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला आहे. दिवसभरातील कामगिरीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि टीसीएस यासारख्या मोठय़ा कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले असून याचा फायदा भारतीय बाजाराला सकारात्मक होत बाजारांनी उच्चांकी टप्पा प्राप्त केल्याचे पहावयास मिळाले आहे.
जागतिक बाजारातील सकारात्मक कल राहिल्याने भारतीय बाजाराला उभारी मिळाली आहे. यामध्ये दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्समधील 30 समभागाच्या मदतीने दिवसअखेर सेन्सेक्स 174.29 अंकांनी वधारुन निर्देशांक 52,474.76 वर उच्चांकी टप्पा गाठत बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 61.60 अंकांसह 0.39 टक्क्यांनी वाढून निर्देशांक 15,799.35 वर बंद झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत सेन्सेक्समधील डॉ.रेड्डीज लॅबचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी वाढले आहेत. यासह पॉवरग्रिड कॉर्प, टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग लाभासह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांपैकी लार्सन ऍण्ड टुब्रो, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह आणि भारती एअरटेलचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
बाजार विक्रमी टप्प्यावर
स्थानिक बाजारातील तेजीचा माहोल कायम राहिल्याने निफ्टी आणि सेन्सेक्सने शुक्रवारच्या सत्रात आपले नवीन विक्रम प्राप्त करत बंद झाला आहे. या कामगिरीमध्ये आयटी, धातूसह रिलायन्स इंडस्ट्रीजमधील नफा कमाईचा बाजाराला फायदा झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.
आर्थिक सुधारणात्मक संकेत
देशात सरकार आर्थिक सुधारणात्मक धोरण राबविण्याची तयारी करत असून यामध्ये चालू आर्थिक वर्षात भांडवल उभारणीचा कार्यक्रम सुरु करणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे बाजाराला बळ मिळाले आहे. यासोबतच आशियातील बाजारात चीनचा शांघाय कम्पोजिट आणि जपानचा निक्की हे घसरणीत राहिले आहेत. तसेच हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे नफा कमाईत राहिले आहेत.