सेन्सेक्समध्ये 123 अंकांची घसरण, फार्मा कंपन्या तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आशियाई बाजारातील नरमाईमुळे सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 123 अंकांनी आणि निफ्टी निर्देशांक 31 अंकांच्या घसरणीसह बंद झाला आहे.
प्रथमपासूनच दबावात असणारा सेन्सेक्स निर्देशांक अखेर सरतेशेवटी 123 अंकांनी घसरणीसह 52,852.27 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 31 अंकांच्या नुकसानीसह 15,824.45 अंकांवर बंद झाला. यादरम्यान निफ्टीतील 50 पैकी 27 समभाग तेजीसह आणि 22 समभाग घसरणीसह बंद झाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्समधील 19 समभाग नुकसानीसह आणि 11 तेजीसह बंद झाले.
निफ्टीतील फार्मा, आयटी, मीडिया व धातू समभागांमध्ये तेजी होती तर ऑटो, सार्वजनिक बँका, वित्त सेवा, खासगी बँकांचे समभाग मात्र कमकुवत होते. एसबीआय लाइफचे समभाग सर्वाधिक 3.96 टक्के तेजीत होते. अन्य तेजी राहिलेल्या कंपन्यांच्या समभागांमध्ये बजाज फिनसर्व्ह, हिंडाल्को, डिव्हिस लॅब, अल्ट्राटेक यांचा समावेश होता. तर जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो, रिलायन्स, एसबीआय आणि बीपीसीएल आदी समभाग मात्र तोटय़ात होते.
सोमवारी भारतीय शेअरबाजार दबावाखाली व्यवसाय करत होता. बीएसई सेन्सेक्स 10 अंकाच्या तेजीसह 52,985 अंकांवर खुला झाला तर निफ्टी निर्देशांक 7 अंकाच्या घसरणीसह 15,849 वर खुला झाला.
निफ्टीतील मिडकॅप निर्देशांक जवळपास 0.5 टक्के इतका तेजीत होता. ऑटो, ऊर्जा व सरकारी बँकांच्या समभागांमध्ये विक्री होताना दिसली. सोमवारी आशियाई बाजार कमकुवत होते. याचा परिणाम भारतीय शेअरबाजारावर दिसून आला. आशियाई बाजारात दबाव होता. जपानचा निक्केई निर्देशांक 1.10 टक्के तेजीत व चीनचा शांघाई निर्देशांक 2.20 टक्के घसरणीत होता. हाँगकाँगचा हँगसेंग अडीच टक्के घसरणीत होता.