सेन्सेक्समध्ये 503 अंकांची घट, बजाज फायनान्स नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी सोमवारी सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात मोठी घसरण अनुभवायला मिळाली. रिलायन्स आणि बजाज फायनान्स या कंपन्या नुकसानीत होत्या.
सोमवारी सकाळी शेअर बाजाराची तेजीसह सुरूवात झाली होती. पण ही तेजी अखेरपर्यंत काही टिकली नाही. सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 503 अंकांच्या घसरणीसह 58,283 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 143 अंकांच्या घसरणीसह 17,368 अंकांवर बंद झाला. सकाळी सुरूवातीला सेन्सेक्स 317 अंकांच्या वधारासह 59,103 अंकांवर कार्यरत होता. दिवसात 59,201 अंकांचा सर्वोच्च स्तरही गाठला होता. त्यामुळे बाजार तेजीतच राहणार अशी परिस्थिती होती. पण नंतर मात्र घसरणीचा प्रवास निर्देशांकाचा सुरू झाला. दुसरीकडे सेन्सेक्स निर्देशांकाने एकावेळी घसरणीनंतर 58,242 अंकांचा नीचांकी स्तरही गाठला.
ऍक्सिस बँक नफ्यात
सेन्सेक्समधील 30 पैकी 8 समभाग तेजीसह तर 22 घसरणीसह बंद झाले. ऍक्सिस बँकचे समभाग सर्वाधिक 3 टक्के इतके वाढल्याचे दिसले. यासोबत सन फार्मा, टायटन, मारूती आणि पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग तेजीसह बंद झाले. घसरणीत कोटक बँक, नेस्ले, बजाज ऑटो, इन्फोसिस यांचे समभाग होते. लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 266.74 लाख कोटी रुपये इतके होते.
निफ्टी निर्देशांकाने 17,639 अंकांचा सर्वोच्च स्तर तर 17,355 अंकांचा नीचांकी स्तर गाठला होता. निफ्टीतील 15 समभाग हे तेजीसह बंद झाले होते तर अर्थातच 35 समभाग मात्र नुकसानीसह बंद झाले.
निफ्टीत बजाज फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रिज नुकसानीत होते. पॉवरग्रिड कॉर्प, ऍक्सिस बँक, हिंडाल्को आणि युपीएल या कंपन्यांचे समभाग तेजीसह बंद झाले. यापूर्वी शुक्रवारी सेन्सेक्स निर्देशांक 20 अंकांनी आणि निफ्टी निर्देशांक 5 अंकांच्या घसरणीसह बंद झाले होते.