भोम सरपंच सुनील भोमकर यांचा इशारा : प्रकल्पाचा फायदा सर्वांनाच होणार
वार्ताहर /माशेल
बाणस्तारी येथील आठवडा बाजारात होऊ घातलेल्या नवीन मार्केट प्रकल्पचा फायदा बागायतदार व श्रमिक लोकांना होणार आहे. भोम अडकोण पंचायतीला त्यामुळे महसूलही मिळणार आहे. सामान्य जनतेला या प्रकल्पात सुखसुविधा उपलब्ध होत असतील, तर मडकईचे आमदार व मनो नेते सुदिन ढवळीकर यांचा त्याला विरोध का ? असा प्रश्न भोम-अडकोण पंचायतीचे सरपंच सुनिल भोमकर यांनी उपस्थित केला आहे.
हा प्रकल्प केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या निधीतून होत आहे. त्याला विरोध करुन सुदिन ढवळीकर यांनी राजकारण करु नये, असेही भोमकर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. यावेळी उपसरपंच वर्षा नाईक, पंचसदस्य शैलेश नाईक गावकर, पांडुरंग अडकोणकर व सीमा गावडे हे उपस्थित होते. गेली दहा वर्षे त्यांचे बंधू दीपक ढवळीकर प्रियोळचे आमदार होते. त्यानंतर एक कार्यकाळ त्यांनी मंत्रीपदही उपभोगले. या काळात त्यांनी बाणस्तारी बाजारपेठेत हा प्रकल्प का आणला नाही ? सध्या स्थानिक आमदार व मंत्री गोविंद गावडे यांनी प्रियोळ मतदार संघात जी विकासकामे व योजना राबविल्या आहेत त्यामुळे ढवळीकर बंधू बिथरले आहेत, असा आरोप सुनील भोमकर यांनी केला.
शैलेश नाईक गावकर म्हणाले, बाणस्तारी बाजारपेठेत केवळ स्थानिक बागायतदारच व्यापारासाठी येत नसून फोंडा तालुक्यासह तिसवाडी तालुका व आसपासच्या भागातील बागायतदार तसेच अन्य व्यापारी आठवडा बाजाराला येतात. या प्रकल्पाचा कष्टकरी लोकांबरोबरच अन्य सामान्य व्यापाऱयांनाही फायदा होणार आहे. भावाचे अपयश लपविण्यासाठी सुदिन ढवळीकरांनी प्रियोळच्या जनतेची दिशाभूल करु नये. बाणस्तारीचा बाजार गेल्या कित्येक वर्षांपासून उघडय़ावर भरत आहे. सामान्य व्यापाऱयांना भर उन्हा पावसात उघडय़ावर व्यापार करावा लागतो. त्यामुळे भोम पंचायतीने याठिकाणी बाजार संकुल उभारण्याची मागणी केली होती. मंत्री गोविंद गावडे यांनी प्राधान्यक्रमाने या प्रकल्पाचे काम हाती घेतलेले आहे. प्रियोळ मतदारसंघात पाणी पुरवठा, वीज पुरवठा या प्राथमिक गरजांमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणलेले आहेत. ढवळीकर बंधूंनी केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून मतदारांची दिशाभूल करण्यासाठी चालवलेला हा खटाटोप असल्याचे शैलेश नाईक म्हणाले.