माजी मंत्री मिकी पाशेको यांचा दावा : पक्षात प्रवेशावेळी ज्येष्ठांनी दिले होते उमेदवारीचे आश्वासन, काँग्रेसला कोणत्याही पक्षाशी युती नको
प्रतिनिधी /मडगाव
आपण काँग्रेसचे नेतेमंडळी व अन्य लोकांना स्पष्ट संदेश देत आहे की, आपण पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसला कोणत्याही पक्षाशी युती झालेली नको असून आपण बाणावली मतदारसंघातून काँगेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणार आहे. बाणावलीतून उमेदवारी देण्याचे आपणास काँग्रेसच्या ज्येष्ट नेत्यांनी पक्षात प्रवेश करतेवेळी आश्वासन दिले होते, असा दावा माजी मंत्री मिकी पाशको यांनी केला.
मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील दावा केला. मी युती नको या मताचा आहे. सध्या राज्यात काँग्रेससह विविध पक्षांचे केंद्रीय नेते गोव्यात येत आहेत. युतीबद्दल स्पष्ट मत व्यक्त करण्याऐवजी आमच्या पक्षातील काही नेतेमंडळी समतोल साधू पाहत आहेत. मात्र मी हे गंभीरपणे घेतले आहे. माझ्या पक्षातील नेत्यांना तसेच लोकांना मी सतर्क करतो की, युतीसाठी अन्य पक्ष जोर लावत आहेत कारण त्यांना युतीची गरज आहे. त्यांच्याजवळ पर्याय नाही, असे पाशेको म्हणाले.
काहींकडून युतीसाठी ब्लॅकमेलिंग
राष्ट्रवादी काँगेसच्या नेत्यांना स्पष्ट संदेश जायला पाहिजे. कारण आतापासून घोडेबाजार सुरू झाला आहे. काहींनी युतीसाठी ब्लॅकमेल करणे सुरू केले आहे, असा चर्चिल यांचे नाव न घेता त्यांच्यावर पाशेको यांनी निशाणा साधला. बाणावली तसेच फातोर्डात युती करा, राष्ट्रवादी काँग्रेसला 10, तर गोवा फॉरवर्डला 8 जागा द्या, अशा मागण्या होत आहेत. उर्वरित मडकई व अन्य काही मतदारसंघ सोडले, तर 20 जागा राहतील. त्या घेऊन काँग्रेस काय करणार, असा सवालही पाशको यांनी उपस्थित केला. काँग्रेस युतीसंदर्भात बोलत नाही. ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न होत असले, तरी काँग्रेसच्या नेत्यांनी भीती बाळगू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
बाणावलीतून लढणारच
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल मला आदर आहे. मात्र त्यांना माहिती असायला पाहिजे की, गेली साडेचार वर्षे राष्ट्रवादीचा एकमेव आमदार भाजपाशी सलगी करून आहे. आता भाजपाच्या पाठिंब्यावर बाणावलीतून जिंकून येणार नसल्याने त्यांच्या या आमदाराला युती पाहिजे, असा नाव न घेता टोला त्यांनी चर्चिल यांना हाणला. बाणावलीतून मी निवडणूक लढणार हे स्पष्ट आहे. काहीही होऊ द्या, मी बाणावलीतून लढणार, असे पाशेको म्हणाले.
फातोर्डाचीही जबाबदारी घेणार
युती होऊन राष्ट्रवादीला बाणावली मतदारसंघ सोडला, तर काय कराल असे विचारले असता, युती होणारच नाही व काँग्रेस प्रवेशावेळी बाणावलीतून तिकीट देण्याचे आश्वासन मला देण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला. बाणावलीला भिडून असलेल्या फातोर्डा मतदारसंघाची जबाबदारी आपण घेणार असून युती करण्यासाठी काँग्रेसकडे तगादा लावणाऱया त्या दोन्ही नेत्यांना धूळ चारणार आहे, अशी भीमगर्जना पाशेको यांनी यावेळी केली.
युती होणारच नाही
20 वर्षांपूर्वी बाणावलीत मी काँगेसचा पाडाव केला होता. मात्र यावेळी पुन्हा बाणावलीत काँग्रेसला जिंकून आणणार आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्याकडे कोणतेही पद नाही, मग आपण युती होणार नाही हे ठामपणे कसे सांगू शकता असे विचारले असता ते निरूत्तर झाले. राष्ट्रवादीशी युती झाली, पण गोवा फॉरवर्डकडे युती केली नाही आणि बाणावली मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडला, तर फातोर्डातून आपण निवडणूक लढवणार काय असे विचारले असता, युती होणार नाही व आपण बाणावलीतूनच लढणार असे पाशेको यांनी स्पष्ट केले. पाशेको यांचा एकंदर रागरंग पाहिला, तर युती होऊन बाणावली राष्ट्रवादीला सोडल्यास ते काँग्रेसला रामराम ठोकून अन्य पक्षाकडून वा अपक्ष म्हणून बाणावलीतून निवडणूक लढविणार असे संकेत मिळत आहेत.