प्रतिनिधी / मडगाव
पेडा-बाणावली येथे सेंट पॉल चॅपल जवळ गुरांची बेकायदेशीर कत्तल केली जात असल्याने, कोलवा पोलिसांनी मजीद बेपारी याला अटक करून त्यांची जामीनावर सुटका केली. एका प्राणी प्रेमी कार्यकर्त्याने या प्रकरणी कोलवा पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली होती.
मजीद बेपारी हा पेडा-बाणावली येथे रहात असून त्याच्या घराजवळच बांधण्यात आलेल्या चार जर्सी गायी, एक वासरू, एक म्हैस, एक बैल अशी 7 गुरे पोलिसांना आढळून आली. ती सर्व कोलवा पोलिसांनी ताब्यात घेतली व जवळच्या गोशालेत पाठवून दिली आहे. पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारला असता, त्यात ताजे गोमांस, हाडे इत्यादी आढळून आले.
मजीद बेपारी यांचे मडगावात गोमांस विक्रीचे दुकान असून तो पेडा-बाणावली येथे गुरांची कत्तल करून गोमांस मडगावात आणून त्याची विक्री करीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या घरात बेळगाव येथील एका पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिलेली काही कागदपत्रे आढळून आली असून ती बनावट असल्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पेडा-बाणावली येथे या पूर्वी देखील अशाच प्रकारे बेकायदा गुरांची कत्तल केल्याचे आढळून आले होते. मात्र, ठोस अशी कारवाई होत नसल्याने प्राणी प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. हल्लीच नावेली व राय भागातून जर्सी गायी व वासरांची चोरी झाली होती. या प्रकरणाचा आत्ता सखोल तपास करावा अशी मागणी या गायींच्या मालकांनी केली आहे.