प्रतिनिधी/ मडगाव
बाणावली येथे एका ट्रॉलर मालकाने आपल्या कामगाराला लोखंडी साखळीने बांधून घालण्याचा प्रकार काल रविवारी उघडकीस आला. या कामगाराला बांधून घालण्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी या कामगाराला दारूचे व्यसन होते व तो मालकाचे म्हणणे ऐकत नव्हता म्हणून त्याला लोखंडी साखळीने बांधून घालण्यात आले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
कामगाराला बांधून घालण्याचा हा प्रकार सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली व त्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी केली. त्यावेळी एका कामगाराला बांधून घालण्यात आल्याचे त्यांना आढळून आले.
बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड सारख्या राज्यांनी असे प्रकार आढळून येतात. मात्र, गोव्यात असे प्रकार होत नाही. मात्र, काल बाणावलीत जो काही प्रकार घडला, त्यावरून तीव्र प्रतिक्रीया व्यक्त झाल्या. एका पायाला लोखंडी साखळी घालून त्याला दोन कुलूप घातल्याने तो चर्चेचा विषय बनला होता.
दरम्यान, या प्रकरणी काश्तू मांझी (झारखंड) यांनी कोलवा पोलीस स्थानकात तक्रार नोंद केल्यानंतर पोलिसांनी राम मांझी व अन्य एका व्यक्तीला अटक करून नंतर त्यांची जामीनावर सुटका केली.