क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज वास्कोतील टिळक मैदानावर बाद फेरीसाठी महत्वाची लढत नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि एफसी गोवा यांच्यात होणार आहे. नॉर्थईस्ट युनायटेडच्या आशा संपल्यात जमा असताना खालीद जमील यांची हंगामी प्रशिक्षकपदी झालेली नियुक्ती निर्णायक ठरली. त्यामुळे संघाची कामगिरी बहरली आणि मोहिमेला कलाटणी मिळाली.
जेरार्ड न्यूस यांच्याकडे सुत्रे असताना हा संघ गुणतक्त्यात खालच्या भागात होता आणि त्यांच्या बाद फेरीच्या आशांविषयी अनिश्चितता निर्माण झाली होती. त्यानंतर खालीद जमीलच्या मार्गदर्शनाखाली नॉर्थईस्ट युनायटेडने सलग तीन सामने जिंकून मोहिम रूळावर आणली आणि आता त्यांचे आव्हान कायम आहे.
मुंबई सिटी फसीला दोन्ही लढतींत हरवून या संघाने मोठी कामगिरी बजावली आहे. आत एफसी गोव्याविरुद्ध आपली क्षमता सिद्ध करण्यास त्यांचा संघ सज्ज झाला आहे. 14 सामन्यांतून 21 गुण अशी समान कामगिरी दोन्ही संघांनी केली आहे. यात सरस गोलफरकामुळे एफसी गोवा चौथ्या तर नॉर्थईस्ट युनायटेड पाचव्या स्थानावर आहेत. नॉर्थईस्ट गेल्या चार सामन्यांत अपराजित आहे तर एफसी गोव्याने गेल्या सात सामन्यांत अपराजित मालिका राखली आहे.
आम्ही एफसी गोव्याच्या कामगिरीची छाननी केली आहे. आम्हाला त्यांच्याविरूद्धच्या सामन्याला चांगल्या पद्धतीने सामोरे जावे लागेल. आम्हाला सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील आणि जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल, असे नॉर्थईस्टचे सहाय्यक प्रशिक्षक ऍलीसन खार्सीन्तीएव म्हणाले. तांत्रिक संचालक खलीद जमील तसेच प्रशिक्षण स्टाफ यांना श्रेय देण्यास मला आवडेल. सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असून आम्ही कोणताही बदल केला नाही, असे ऍलीसन म्हणाले.
पहिल्या टप्प्यात या दोन संघांमध्ये 1-1 अशी बरोबरी झाली होती. एफसी गोवाचे प्रशिक्षक जुआन फॅरांडो यांना प्रतिस्पर्ध्याच्या कडव्या आव्हानाची अपेक्षा आहे. नॉर्थईस्ट युनायटेडने खडतर लढती जिंकल्या तसेच त्यांचे खेळाडू मैदानावर मुक्तपणे खेळतात. त्यांनी अनेक सकारात्मक बाबी कमावल्या आहेत, असे फॅरांडो म्हणाले.
आजच्या लढतीत एफसी गोव्याला कप्तान एदू बेडियाचे निलंबन तसेच ब्रँडन फर्नांडिस याला दुखापतीमुळे मुकावे लागेल. त्यामुळे त्यांच्यासमोरील आव्हान अवघड झाले असेल. बाद फेरीच्या चुरशीमुळे दडपण येत असल्याचे फॅरांडो यांनी मान्य केले. मला सर्व काळ दडपण जाणवते व ते भारतीय लीगसाठी चांगले आहे, कारण बहुतांश संघांमध्ये तीन किंवा चार गुणांचा फरक आहे. आमच्या संघासाठी हे चांगले आहे, प्रत्येक सामना महत्वाचा असतो आणि आमचा दृष्टिकोन 3 गुण जिंकण्याचा असतो, असे फॅरांडो शेवटी म्हणाले.