प्रतिनिधी/ सातारा
ऑक्टोबर महिन्यात हळूहळू तर नंतर नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा कहर मावळत गेला. डिसेंबरच्या आरंभानंतर बाधित वाढीचा खाली घसरला तर कोरोनामुक्तीचा वेग गेल्या 13 दिवसात चांगला वाढल्याचे समोर आले आहे. गेल्या 13 दिवसांत एकूण बाधितांची संख्या 2,342 आहे तर त्यापेक्षा जास्त 2,590 कोरोनामुक्तांची संख्या आहे. तर एकूण 50 बाधितांचा मृत्यू झाला असून सध्या तरी परिस्थिती आटोक्यात येत असल्याने जिल्हावासियांना दिलासा लाभत आहे. सध्या प्रत्यक्ष उपचारार्थ 566 असून कोरोना केअर सेंटरमध्ये 79 रुग्ण आहेत तर जवळपास 685 जण होम आयसोलेट आहेत.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी 128 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात फक्त 3 बाधितांचा मृत्यू झाला आहे तर रात्री उशिरा आलेल्या अहवालात 00 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोनामुक्तीचा वेग वाढला
गेल्या दोन, तीन दिवसात शुक्रवारी एकही मुक्त नाही, शनिवारी फक्त 2, रविवारी फक्त 1 अशी कोरोनामुक्ताचा आकडेवारी येत होती. सोमवारी मात्र कोरोनामुक्तीने गिअर बदलला आहे. 128 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून आता एकूण कोरोनामुक्तांची संख्या 50,305 झाली आहे. कोरोनामुक्तीचे हे प्रमाण 94 टक्केंवर गेले आहे. कोरोनामुक्तीचा वेग असाच वाढता राहिल्यास लवकरच जिल्हा कोरोनामुक्त होवून भयमुक्त होवू शकतो.
सातारा, फलटण, खटावमध्ये काळजीची गरज
बाधित वाढीचा वेग मंदावलाय मात्र अल्प प्रमाणात ती सुरु आहे. आकडे 100 च्या खाली आले तरी सध्या सातारा 23, फलटण 14, खटाव 11 येथे दोन अंकी संख्येने वाढ होत आहे ती थांबण्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. इतर 9 तालुक्यात एक अंकी वाढ असून कराडकरांना दिलासा लाभू लागलाय. पाटण, कोरेगाव, जावली, महाबळेश्वरमध्ये नवीन रुग्ण वाढ चांगलीच मंदावलीय. दुसऱया लाटेची शक्यता मावळू लागल्याचा दिलासा अनुभवताना आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करावी लागणार आहे.
प्रत्यक्ष उपचारार्थ फक्त 566 रुग्ण
एकूण उपचारार्थ रुग्ण संख्या 1,501 दिसत असली तरी त्यापैकी प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱयांची संख्या फक्त 566 आहे. तर कोरोना केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन 79 आहेत. यामध्ये उपचारार्थ व इतर जिल्हय़ातील 231 वजा केल्यास 685 जण जिल्हय़ात होम आयसोलेशनमध्ये असून त्यांच्याशी आरोग्य विभाग संपर्कात आहे. कोरोना केअर सेंटर आता ओस पडली असून आटोक्यात येणारी परिस्थिती ही काळजी घेण्यामुळेच येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हे अद्याप जिल्हावासियांनी काळजी घेतच वाटचाल करावी लागणार आहे.
जिल्हय़ात 3 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात कोरेगाव येथील चिमणगाव, ता. कोरेगाव येथील 74 वर्षीय महिला, शिरढोण, ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय पुरुष तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये वरोशी, ता. जावली येथील 77 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
306 जणांचे नमुने तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 43, कराड 27, फलटण 6, वाई 29, खंडाळा 14, रायगाव 22, पानमळेवाडी 23, महाबळेश्वर 10, दहिवडी 20, खावली 28, तळमावले 22, तरडगाव 11 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 51 असे एकूण306 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.