अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार, 2 ऑक्टोबर 2021, सकाळी 10.30
●7592 तपासण्या, तर 183 बाधित
● कोरोनाला वेशीबाहेर ठेवण्याचा निर्धार
● महाबळेश्वर झाले कोरोना मुक्त
● धार्मिक स्थळे सुरू करण्याची तयारी
● इतर आजारांकडे लक्ष देण्याची सूचना
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील दररोज बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या 200 च्या आसपास आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक संख्या ही बरे होणाऱ्यांची आहे. धार्मिक स्थळे दि. 7 पासून खुली होणार असल्याने आणि शाळा दि. 4 पासून सुरू होणार असल्याने त्याची तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील शहरांनी आणि गावांनी कोरोनाला वेशीबाहेर हाकलून देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बहुतांशी गावे कोरोनामुक्त झाली आहेत. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार हे प्राथमिक आरोग्य केंद्राना सरप्राईज व्हिजिट देत आहेत. दरम्यान, दि. 1 रोजी दिवसभरात 7,592 तपासण्या करण्यात आल्या त्यात 183 जण बाधित आले असून पॉझिटिव्हीटी 2.41 वर आहे.
स्वॅब तपासणी 21 लाखांसमीप
गेल्या सतरा महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाने बस्तान मांडले आहे. आता ते प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यातील लोकसंख्या सुमारे 35 लाख असून, त्यापैकी 20 लाख 93 हजार 853 जणांचे स्वॅब घेण्यात आले, काल रात्री बारा वाजेपर्यंतची ही संख्या होती. दररोज 8 हजार जणांचे स्वॅब तपासणी करण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 48 हजार 746 एवढे बाधित आहेत तर घरी सोडलेले 2 लाख 39 हजार 538 आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावलेले 6086 जण आतापर्यंत आहेत 5387 जण उपचार घेत आहेत.
महाबळेश्वर तालुका कोरोनामुक्त
अनलॉक झाल्याने सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या बाबतीत कोरोना वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु पर्यटनस्थळी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याने पर्यटनस्थळ सुरक्षित असून पर्यटकांसाठी माहेर असलेल्या महाबळेश्वर शहर व तालुका कोरोना मुक्त झाला आहे. पाचगणी आणि महाबळेश्वर या दोन्ही शहरात स्थानिक स्वतः नियमांचं पालन करत आहेत. येणाऱ्या पर्यटकांना ही नियम पाळायला लावतात. त्यामुळे कोरोनाला बाजूला ठेवण्यात महाबळेश्वर, पाचगणी सुरुवातीपासून यशस्वी ठरली आहे.
शाळा अन् धार्मिक स्थळे होणार सुरू
कोरोना या जागतिक संकटातून धार्मिक स्थळेही कुलूप बंद होती. मठ, मंदिरे यासह सर्वच धार्मिक स्थळे जिल्ह्यातील बंद ठेवण्यात आली होती. ती उघडण्यासाठी आंदोलन झाली. आता दि. 7 पासून ही धार्मिक स्थळे उघडणार आहेत. तसेच शाळा सुरू व्हायला ही दोन दिवस उरले आहेत. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे आणि माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी सर्व शाळांना सूचना दिल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी गलबलाट कित्येक दिवसांत ऐकायला मिळणार आहे.
शनिवारपर्यंत
एकूण नमूने –20,93,853
एकूण बाधित –2,48,746
घरी सोडण्यात आलेले – 2,39,538
मृत्यू –6,086
उपचारार्थ रुग्ण –5,387