दिवसभरात देशात सर्वात मोठी रुग्णवाढ : आतापर्यंत 6,77,423 रुग्णांना डिस्चार्ज
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतामध्ये रविवारी कोरोना बाधितांची एकूण रुग्णसंख्या 10,77,618 इतकी झाली आहे. त्यापैकी 6,77,423 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 3,73,379 रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत देशात 26,816 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि ब्राझीलनंतर आता भारतात एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.
जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात झपाटय़ाने वाढत आहे. देशात आतापर्यंतची एका दिवसातील कोरोना रुग्णसंख्येतील सर्वाधिक वाढ रविवारी नोंदवली गेली. कोरोना महामारीचा विळखा दिवसागणिक अधिक घट्ट होत चालला आहे. गेल्या चार दिवसात भारतात 30 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीस देशात 3 लाख 73 हजार 379 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 6 लाख 77 हजार 423 जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
देशात 18 जुलैपर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 कोटी 37 लाख 91 हजार 869 नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यातील 3 लाख 58 हजार 127 नमुने शनिवारी तपासण्यात आले आहेत.
भारत जगात तिसऱया नंबरवर
कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भारत अमेरिका, ब्राझीलनंतर तिसऱया स्थानावर आहे. अमेरिकेत 38,33,716 कोरोनाबाधित आहेत तर ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 20,75,246 वर पोहोचला आहे. ‘वर्ल्डोमीटर’च्या आकडेवारीनुसार जगात आतापर्यंत 1 कोटी 44 लाख 54 हजार 023 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. तर बळींची संख्या 6 लाख 5 हजार 619 इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात रविवारपर्यंत 10 लाख 77 हजार 618 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.