प्रतिनिधी / बेळगाव
अनेक कोरोनाबाधितांवर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बाधितांचे नातेवाईक थेट वॉर्डमध्ये फिरताना दिसत आहेत. ही गोष्ट लक्षात आल्यामुळे कर्नाटकचे मुख्य सचिव पी. रविकुमार यांनी नातेवाईकांना वॉर्डमध्ये प्रवेश देऊ नका, अशी सूचना अधिकाऱयांना केली होती. त्यामुळे बिम्स प्रशासनाला उशिरा का होईना, जाग आली असून वॉर्डमध्ये नातेवाईकांना प्रवेशबंदी करण्याबरोबरच बिम्सच्या आवारात बेकायदा वाहनांना प्रवेशबंदी जाहीर केली आहे.
यासंबंधी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून रुग्णांच्या नातेवाईकांना वॉर्डमध्ये प्रवेशबंदी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखता येणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी वेगवेगळय़ा उपाययोजना केल्या जात आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱया बाधितांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक थेट वॉर्डमध्ये पोहोचत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यांच्या नातेवाईकांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी केलेल्या उपाययोजना वाया जात
आहेत.
नपेक्षा कोणीही वॉर्डमध्ये प्रवेश करू नये
नागरिकांनी बाधितांना भेटण्यासाठी थेट वॉर्डमध्ये जाऊ नये. ज्यांना भेटणे अनिवार्य आहे, अशा नातेवाईकांनी बिम्समधील समन्वय अधिकाऱयांची भेट घेऊन त्यांची पूर्वपरवानगी घ्यावी. परिस्थिती लक्षात घेऊन सर्व खबरदारी घेत त्यांना परवानगी देता येणार आहे. नपेक्षा कोणीही वॉर्डमध्ये प्रवेश करू नये, असे आवाहनही डॉ. विनय दास्तीकोप यांनी केले आहे.
खासगी रुग्णवाहिका-शववाहिकांनाही बंदी… बिम्सच्या आवारात व शवागाराबाहेर रुग्णवाहिका आणि शववाहिका घेऊन खासगी व्यक्ती थांबत आहेत. रुग्णांची ने-आण करण्यासाठी आणि मृतदेह नेण्यासाठी भरमसाट पैशांची मागणी केली जात आहे. यासंबंधी अनेक तक्रारीही आपल्याकडे आल्या आहेत. या खासगी रुग्णवाहिका व शववाहिकांशी बिम्स प्रशासनाचा काही एक संबंध नाही. मात्र, नागरिकांमध्ये नाहक गैरसमज निर्माण होत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून भरमसाट पैसे उकळणाऱया रुग्णवाहिका, शववाहिका आणि ऑटोचालकांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात प्रवेश करू नये, अशी सूचना डॉ. विनय दास्तीकोप यांनी केली आहे.