बाप्पांच्या आगमनाची तयारी पूर्ण
प्रतिनिधी/ बेळगाव
‘सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नविनायक गणराया’ असे म्हणत बाप्पा मोरयाच्या गजरात शुक्रवारी सर्वत्र बाप्पाचे आगमन होणार आहे. कोरोनामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत बेळगावकर आता बाप्पांच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत. घरोघरी तसेच सार्वजनिक पातळीवरील श्रीमूर्तींच्या प्राणप्रतिष्ठापनेची तयारी सुरू झाली आहे. मात्र कोरोनाला आळा घालण्यासाठी यावषी कोरोनाचे नियम पाळत गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. बाप्पा येणार यामुळे सगळीकडेच उत्साह आणि आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांनी बुधवारी सर्व प्रकारची पूर्वतयारी केली.
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक सण-उत्सवांवर निर्बंध आले आहेत. अशा परिस्थितीत मागील आठवडय़ापासून बाजारपेठ बहरली आहे. शुक्रवारी सकाळपासून शहरात सर्वत्र गणेशाच्या स्वागताची धामधूम असणार आहे. वाद्याच्या गजरात गणरायाला आपापल्या घरी आणण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी मूर्तिकारांकडे होणार आहे. घरोघरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व आरती केल्यानंतर मंडळांचे कार्यकर्ते सार्वजनिक मूर्तींचे स्वागत करण्यात गुंतणार आहेत.
सजावट आणि श्रीचा प्रसाद यासाठी लागणाऱया साहित्याची खरेदी करण्यासाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत भाविकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. उत्सवाच्या निमित्ताने नवे पोशाख, नवनव्या वस्तूंची खरेदी जोरदार सुरू होती. सायंकाळनंतर घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये आरास सजविण्यात भाविक मग्न होते.
गणरायाचे वास्तव्य काही घरांत दीड दिवस, काही ठिकाणी पाच ते सात दिवस आणि काही ठिकाणी संपूर्ण 10 दिवस असे असते. आपापल्या चालीरिती आणि परंपरेनुसार भाविकांनी यासाठीची पूर्वतयारी केली आहे. सार्वजनिक गणेशाचे वास्तव्य अनंत चतुर्दशीपर्यंत असते. त्या दृष्टीने मंडळांनीही सर्वप्रकारची सज्जता ठेवली असून आता भाविकांना आस लागली आहे ती गणरायांच्या आगमनाची. यामुळे लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत सर्वांमध्येच शुक्रवारच्या स्वागत समारंभाची तगमग लागून राहिली आहे.
गणराय विद्येची देवता म्हणून ओळखली जाते. प्रत्येक कार्याची सुरुवात ही गणेश वंदनेने होते. यामुळे गणरायाची महती अगाध आहे. या आवडत्या देवतेचे स्वागत थाटात व्हायला हवे, अशी प्रत्येक भाविकाची मनोकामना असते. त्या दृष्टीने बेळगावनगरी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव यंदाही त्याच उत्साही वातावरणात साजरा करणार हेच चित्र सामोरे येते. बेळगावातील भाविकांत गणेशोत्सवाबद्दल नेहमीच आकर्षण आहे. सर्व स्तरातील लोक आपापल्यापरीने या आराध्यदेवतेची पूजा करतात. दरवर्षी काहीतरी नवे आणि वेगळे करत गणरायाच्या स्वागतात नाविन्य जपण्याचा प्रयत्न बेळगावकरांनी वारंवार केला आहे. पूर्वी बेंजोच्या तालावर गणेशमूर्ती आणल्या जात होत्या. आता पारंपरिक वाद्यांकडे भाविक वळले असून यावर्षी पारंपरिक वाद्यांच्या तालावर शहरात सर्वत्र गणरायांच्या स्वागताची तयारी पहावयास मिळते. मात्र कोरोनामुळे या साऱयांवर विरजन पडण्याची शक्मयता नाकारता येत नाही.