खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी, कोरोनाचे नियम धाब्यावर
वार्ताहर /कराड
आज घरोघरी व सार्वजनिक मंडळात गणराया विराजमान होणार आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कराड शहरासह परीसरात जयय्यत तयारी करण्यात आली आहे. गणरायाचे स्वागत व सजावटीचे साहीत्य खरेदीसाठी गुरूवारी दिवसभर कराडच्या बाजारपेठेत झुंबड उडाली होती. यावेळी कोरानाच्या नियमांचा नागरीकांना विसर पडल्याचे पहावयास मिळाले.
गेल्या दिड वर्षांपासुन कोरोना व लॉकडाऊन संकट असल्याने गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कराड तालूक्यासह सातारा जिलह्यात कोरोनापासुन काही अंशी दिलासा मिळाल्याने गणेशोत्सवाचा उत्साह व्दिगुणीत झाला आहे. अध्याप कोरोना संकट असल्याने प्रशासनाने गणेशोत्सव काळात अनेक निर्बध घातले असुन गणेशोत्सव साधेपणाने व सामाजीक उपक्रम राबवत साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
यावर्षी चार फुटापेक्षा मोठया मुर्तीस परवानगी नसल्यलाने कुंभारवाडयात तिन फुट व त्यापेक्षाही कमी उंचीच्या मुर्ती बनवण्यात आल्या आहेत. त्यातही बहुतांष मुर्ती या शाडुच्या आहेत. शुकवारी गणराया विराजमान होणार असल्य़ाने कुंभारवाडयात मुर्तीवर आखेरचा हात फिरवण्याची कारागीरांची लगबग सुरू होती. तर सजावटीचे साहीत्य खरेदीसाठी बाझारपेठेत झुंबड उडाली होती. प्लास्टीकचे हार, फुले, मोत्यांच्या माळा, लाईटींगच्या माळा, रूमाल, फ्लॉवरपॉट, मखरे, छोटे मंडप खरेदीसाठी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. गुरूवारी आठवडी बाजार त्यातच गणेशोत्सवाची खरेदीसाठी गर्दी झाल्याने दिवसभर बाजारपेठेत वाहतुक कोंडी झाल्याचे पहावयास मिळाले. वाहतुक सुरळीत करण्यासाठी चौकाचौकात वाहतुक पोलिस तैनात करण्यात आले होते. परगावसह शहरातील अनेक नागरीकांनी गुरूवारीच कुंभारवाडयातुन मुर्ती नेल्या. यामुळे कुंभारवाडयातही गर्दी झाली होती. कोरोनामुळे रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी स्टेज व मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी नसल्याने अनेक मंडळांनी गाळे, घरी अथवा खाजगी जागेत मंडप घातले आहेत. गुरूवारी दिवसभर मंडळांचे कार्यकर्ते मंडपात सजावटीचे काम करीत होते. तर घरोघरीही सजावटीची लगबग सुरू आहे. सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज आगमण होणार असल्याने सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण आहे.